Diwali Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986.

मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! मला वेळ नाही. एक साधी बाई आली तर माताजी लायकी येत नाही. दसरे लोक आले. म्हणे, फार मोठे उठून आल्या भेटायला. हे असं कसं? अहो, जे तुम्हाला साधे दिसते, सामान्य दिसते, तेच आम्हाला असामान्य वाटते त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसेच आम्ही चालणार आहोत की नाही! तसेच सहजोगाचंसुद्धा डोकं असायला पाहिजे. बेकारच्या लोकांकडे आपला वेळ दवडू नये. जी मंडळी परमेश्वराला शोधत आहेत आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला, लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे. आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण समजा एखाद्या दारूड्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भुतं लागली आहेत अशा माणसाला दिवा दाखवला, तर तो तुम्हालाच खायला धावेल. तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय? जगात पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंध:कारात आहेत आणि त्यांना परमेश्वराला भेटायचे आहे. पण असे ही पृष्कळ लोक आहेत, की देवाला कशासाठी भेटायचं तर आम्हाला काही तरी त्यातून भौतिक लाभ झाला तर बरं होईल. आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो, त्याबद्दल शंका नाही. आज इकडे लक्ष्मीपूजन आपण इथे करीत आहोत त्याला हेच कारण

आहे, की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे. त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्यातली, या पुण्यभूमीतील अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं ! अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारूती आहेत आणि जितके गणपती आहेत. तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, की ह्या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मधे बसून देवाच्या नावावर पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बंद केलं पाहिजे. ‘मोठं कठीणच काम दिसतं माताजी हे!’ आहेच, पण सहजयोगात इलाज आहेत ह्या लोकांचे. अनेक इलाज आहेत. ते इलाज आपण केले पाहिजेत. शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून सगळ्यांची आज्ञा चक्रं खराब करतात, त्या आज्ञा चक्रावरून प्रहार करून जो मनुष्य जागरूक असेल त्यालासुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे साधे दिसणारे लोक आहेत त्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या देशांमध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात, त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण ही सगळी मंडळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करीत असतात. बसतात देवाच्या देवळात. त्यांना देवाची काही भीती नसते. देवाच्या देवळात बसून प्रेतविद्या आणि स्मशानविद्या करतात. कोलकाताला मी गेले. तेव्हा तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहजयोग होतो की नाही होत . जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काही तरी बाधा! गरिबी म्हणजे इतकी झालेली आहे कोलकाताला, इतकी गरिबी आहे, की एखादे उजाडलेले मोठे गाव असावे आणि अशी अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला, ती कोलकाताची स्थिती आहे. त्या लोकांना मी विचारलं, ‘तुमचं असं कसं? तुम्ही गेले होते का?’ ‘हो, म्हणे, ‘आम्ही दीक्षित आहोत.’ तिथे दीक्षित नाही म्हणत दीखित म्हणतात. सगळी मंडळी दीखित. इथून तिथपर्यंत सगळे दीखित लोक. म्हणून दीखित बरोबर दु:खी लोक असणारच. पण त्यांना सांगायची सोय नाही, की बाबा रे , तुम्ही हा दीखितपणा करीत आहात हे बरोबर नव्हे. हे लोक सगळे उपटसुंभ आहेत. बरं नुसते पैसे घ्यायचे असते तर हरकत नाही. पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात, ते म्हणजे अत्यंत जालीम आहेत. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो. प्रत्येक देवस्थानी! तुम्ही जेरूसलेमला जा, नाहीतर मक्क्याला जा आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो. त्याने अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, की इकडून बाधा आली की ती चालली बाहेर. दसरी गोष्ट व्यसन. व्यसनाच्या अधीन असल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार नाही. असं म्हणतात की, ‘इकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर.’ नुसतच बाटलीच नाही. अनेकतऱ्हेची आपल्याला व्यसनं आहेत. आता सहजयोगाने सर्व व्यसनं सुटतात. ही गोष्ट खरी आहे. थोडीशी जर अशी मेहनत केली तर सर्व व्यसनं सुटतील. जर व्यसनं असली तर लक्ष्मी तर जाणारच, पण यशसुद्धा आयुष्यात कधी येणार नाही. तुमच जे यश आहे तेसुद्धा संपुष्टात येणार, लक्ष्मी गेल्याबरोबर. राजलक्ष्मी गेली , गृहलक्ष्मी गेली, कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला, तर लक्ष्मी घरातून उठते. ती घरात टिकणार नाही. तुम्ही कितीही दिवे लावा, पण ती काही आत येणार नाही. कारण तुम्हाला दिसत नाही काय आहे ते घरात. तिला दिसतं, तेव्हा ती बाहेरच्या बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, तुम्ही कितीही लक्ष्मीची आरती केली, सुक्त म्हटली, काहीही केलं, काही फायद्याचं नाही. उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरत आहात

तुम्ही. हे करा, ते करा, त्यातच तुमची सगळी स्थिती होणार. तेव्हा पहिल्यांदा असे काही जे विचार आहेत, ज्याने आपण ह्या अशा लोकांच्याकडे जातो किंवा वाममार्गाकडे जातो, ते विचार आपण टाकून दिले पाहिजे. आता तुम्ही असे म्हणाल, तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. असं कसं. तुकाराम काही श्रीमंत नव्हते. असे तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते अस दिसेल. सगळ्यांना असं वाटेल, त्यांच्याकडे दागदागिने नव्हते, काही नव्हतं मग लक्ष्मी कशी? त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा, जेव्हा शिवाजी महाराज सगळे दागदागिने घेऊन त्यांच्या दारावर पोहोचले. तेव्हा त्यांनी शिवरायांना सांगितलं, ‘आम्ही शेतकरी. आम्हाला हे करायचय काय ? हे तुमच्याजवळ राहू द्या. तुम्ही राजे लोक तुम्ही वापरा हे. ‘ म्हणजे केवढा श्रीमंत असला पाहिजे हो तो ! आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा, जो फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलात तर त्याला मोह होईल की नाही. असा कोणताही श्रीमंत मला दाखवा ज्याला मोह होणार नाही. एक आमचं सोडून द्या. बाकीचे. ज्याला मोह वाटतो, जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो, आणि हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. हा मूलखाचा भिकारी झाला आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी! एक दोन पैशाची कुठे वस्तू राहिली, तर ‘अरे एक दोन पैशाची वस्तू राहिली,’ म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं. तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहजयोगात. ज्या लोकांच्या घरी जावं, तिथे घरात काही नसलं तरीसुद्धा प्रेमाने, ‘माताजी, आमच्याजवळ जे आहे ते एवढेच आहे. आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही. थोडी भाकरी आहे. घेता का?’ केवढ श्रीमंत वाटतं ते ! जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं. ते प्रेमाने, गोड मानून खायचं. त्यात खरी श्रीमंती त्यांची दिसून येते, की जे आहे घरी ते सगळे पुढे आणून ठेवलं. तेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जा. अर्ध बंद करून ठेवतील. ‘तुम्ही घेता का चहा?’ घेत असलात तर घ्या. नाही तर ठीक आहे. नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत! त्या शबरीने रामाला जी बोरं आणून दिली, रामाला काय खायला नव्हतं की काय? त्या बोराचं त्यांनी एवढं महत्त्व केलं. त्यातच सिद्ध होतं की एवढी श्रीमंत ही शबरी! पाहुणचाराला आले तर त्यांनी तिचा मान ठेवून उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती आहे. पैसा असो वा नसो मनुष्य श्रीमंत असू शकतो. आपल्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहजयोगात ते ही मना आहे. तुम्हाला आम्ही कोणी शबरीच्या स्थितीला नेत नाही. सहजयोगात लक्ष्मी ही मिळणारच. म्हणजे अगदी लक्ष्मीच! ती सगळ्यांना मिळणार त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात. पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं, की तुम्ही सहजयोगात येऊन गरीब झाले तर कोणी सहगयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे. त्याबद्दल शंका नाही. त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही. म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. नाभी चक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते. पण नाभी चक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे, त्यातलं पहिलं गृहलक्ष्मीचं स्थान आहे. आपण असेही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहाल बाई होती. जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती. तर घरातील गृहलक्ष्मी ০

कशी आहे त्याच्यावरून लक्ष्मी येणार. तिला जर बाधा असती आणि नवरा तिच्या बाधितपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार नाही. पण ती जरी बाधित असली आणि नवऱ्याने सांगितलं , की ही तुझी बाधा गेलीच पाहिजे किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनून, ‘दारू पाहिजे ना तुला माझे दागिने ‘ ‘बरं, मग.’ ‘माझ मंगळसूत्र घे. जे पाहिजे ते घे तू. मी पतिव्रता आहे फार मोठी!’ अस म्हणून आणखीन घे तू. त्याला नरकात ढकलत असते. अशांच्या घरी कधीही लक्ष्मी राहू शकत नाही. गृहलक्ष्मी म्हणजे एक तेजस्वी स्त्री असायला पाहिजे. तिचं असं आयुष्य असायला पाहिजे, की जिला बघून पुरुषाला ही वाटलं पाहिजे की ‘काहीतरी घरात आहे बरं का! काहीतरी असं तसं आम्ही वेडवाकडं केलं तर चालायचं नाही घरात.’ पूर्वी पुरुष लोक कशामुळे? आरडाओरडा करून नाही झालेला. पण एक त्या बाईच्या तेजस्वितेने असेल. तिची उदात्तता, तिचं गांभीर्य, तिची बायकांना ‘मालक’ म्हणत असत, ‘साहेब ‘ म्हणत असत. एक दरारा असायचा अशा बायकांचा. तो दानशूरता, तिची निष्ठा, तिची सेवा, तिचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींनी त्या बाईला एक प्रकारची तेजस्विता आणि चारित्र्य दिलं आहे. ती गोष्ट सुटून आजकाल गृहलक्ष्मी म्हणजे, त्याला नाव म्हणजे, आजकालच्या गृहलक्ष्मींची कशाशी तुलना करायची तेच मला समजत नाही. कारण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच कळत नाही मला. नवऱ्याची, किंवा घरातील मुलांची, सासू-सासऱ्यांची, सगळ्यांची सेवा केली पाहिजे. हे कबूल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या घाणेरड्या गोष्टी, त्यांच्या मूर्खासारख्या गोष्टी त्याला मान्यता द्यायची किंवा त्यांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते काम करायचं. वाट्टेल त्या मार्गाने जायचं. वाट्टेल तसं वागायंच. ‘मग नवरा आहे, माताजी.’ ‘मग काय झालं?’ ‘नवराच आहे.’ ‘असं का!’ नवरा आणि तुम्ही…. सांगत नाही मी, पण समजलं तुम्हाला. ह्या गृहलक्ष्मीची स्थिती एखाद्या कमळासारखी असायला पाहिजे. कमळ हेच गृहलक्ष्मीचं स्थान आहे. नेहमी पाण्यावर, सुगंधित, अत्यंत नाजूक आणि लक्ष्मीला सबंध आधार अशी असणारी. ही कमळासारखी व्यक्ती असायला पाहिजे. ती राजलक्ष्मी असायला पाहिजे. दारोदार भीक मागणे, ‘आज द्या हो तुमची साडी नेसायला म्हणजे बरं होईल. ‘ ‘कुठे निघालात तुम्ही?’ ‘नाही मला दाखवायचं आहे लोकांना असं.’ कोणत्याही प्रकारची खोटी घमेंड किंवा कोणत्याही प्रकारचा लपंडाव, त्याची एक आढ्यता, त्याची एक ऐट ही स्त्री मध्ये असली म्हणजे तिच्यात राजलक्ष्मी विराजमान होते, (जणू तिला असं वाटतं). खरोखर लक्ष्मीपूजन म्हणजे स्त्रियांवरच लेक्चर द्यावे लागत आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण तशी गोष्ट नाहीये. तिसरी म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे, आपले जे गणपती आहेत, गणपतीचे म्हणजे जे विशेष स्वरूप आहे, म्हणजे तो अत्यंत निष्पाप आहे. तसं निष्पाप असायला पाहिजे. (गणपतीला) अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असूनसुद्धा. जसं हत्तीला हे समजतं की चांगलं काय आणि वाईट काय! सुबुद्धी म्हणजे अगदी तल्लख आहे त्याची. चालतांनासुद्धा धावतपळत चालणार नाही. पुष्कळशा बायकांना मी बघते त्या बायकांसारख्या चालतच नाही, घोड्यासारख्या चालतात. आणि एवढी धावपळ, हे धर रे, ते धर रे, हे धाव रे, ते धाव रे. मला परवा कोणीतरी प्रश्न विचारला, ‘लहान मूलांना ब्लड कॅन्सर कसा होतो ?’ म्हटलं, ‘त्यांच्या आईला जाऊन बघा. ती धावपळी असेल.’ धावपळ करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडे गजलक्ष्मी असू शकत नाही. पण त्याचा

अर्थ असा नाही, की काही करायचंच नाही. जे करायचं ते सुबक आणि सुंदरतेने करायचं. एवढा मोठा हत्ती आहे, त्याला जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो, सोंडेत व्यवस्थित घेऊन, गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरासुद्धा कुठे स्पर्श होऊ देत नाही. ही सुबकता त्याला सुगुण असं गृहिणी म्हणतात, ती यायला पाहिजे. आता हे सगळं जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेरड्या बायकांच्या मागे ते धावतात किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात किवा एखाद्या जबरदस्त बायकोला ते घाबरतात. तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राहू शकत नाही. जे आपल्या पत्नीला, जी सुपत्नी आहे, तिला त्रास देतात त्यांच्या घरी लक्ष्मी राहू शकत नाही. पुरुषांना असं वाटतं जेवढी काही अब्रू वगैरे आहे ती बायकांनाच असते, पुरुषाला काही अब्रू वगैरे नसते. तो कसाही वागला तरी तो धार्मिकच असतो. त्याला असं वाटतच नाही की दुसऱ्यांकडे वाईट नजरेने पाहणे हे अधार्मिक आहे. असं पुरुषाला वाटतच नाही, म्हणजे रियलायझेशनच्या आधी. सहजयोगानंतर तुमचे डोळेच असे फिरतात उलटे. तुमच्या डोक्यातच हे विचार येत नाहीत. हे मोहाचे विचारच येत नाहीत असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्मी तुमच्यामध्ये जागृत झाल्या! कुठेही उभे राहिलात तरी तुमचे चित्त कधीही पडणार नाही. जशी ज्योत नेहमी वर उठते, तसेच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहणार. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी येणार.. ते अनेक प्रकार आहेत. नरसिंह भगतची हुंडी पटवली ते माहिती असेलच आपल्याला. कृष्णाने सुदामाची द्वारका बांधली. द्वारिकेतून जाऊन त्याची सोन्याची घरं बांधली. ते माहिती असेल आपल्याला. द्रौपदीचे वसत्रहरण होत असतांना श्रीकृष्णाने तिच्या लज्जेचे रक्षण केले हे ही माहिती असेल आपल्याला. ह्या सर्व चमत्कार गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण रहाल. अत्यंत चमत्कारपूर्ण जीवन असेल. रोज नवीन नवीन चमत्कार, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कशा तऱ्हेने चमत्कार तुमच्यासमोर येतात. तुम्हाला आशीर्वादित करतात. ही सगळी लक्ष्मीचीच कृपा आहे. हे सगळे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची कृपा आहे. अनेक तऱ्हेचे आशीर्वाद असतात. परवा मी एक साडी घेतली विकत. तीन हजार रुपयांना मिळाली. ती दुसऱ्या माणसाला दाखवली, तर तो म्हणतो, बाजारात ह्याची कमीत कमी किंमत पंधरा हजार असायला पाहिजे. म्हटलं, ‘नाही, आम्हाला तर ही तीन हजारातच मिळाली.’ ही लक्ष्मीची कृपा म्हटली पाहिजे. दुसरा येऊन सांगतो, ‘माताजी, बघा. माझ्याजवळ पैसे नव्हते. मी अस ठरवलं गणपतीपुळ्याला यायचं, तर कसं काय येणार. माझ्याकडे पैसे नव्हते.’ तर लगेच टपालाने पत्र आलं की, ‘तुझे एवढे पैसे वाचले होते. ते तुला परत पाठविले आहेत.’ हे सगळें एक पैश्याच्या दृष्टीने झालं. पण तशा अनेक आहेत. तुमची तब्येत खराब झाली. तुम्ही म्हटलं, ‘माताजी, माझी तब्येत खराब झाली. ‘ झालं उद्या ठीक. ‘अहो, कसं काय झालं?’ डॉक्टर म्हणतात, ‘असं कसं शक्य आहे ? आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. असं कसं झालं.’ ही लक्ष्मीची कृपा आहे. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ जे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या कृपेने होतो. सर्व तऱ्हेचं क्षेम असतं. नुसतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, समजा, तुमची तब्येत ठीक नसली, तर डॉक्टर तुमचं सगळ आर्थिक घेऊन जाणार. सर्वतऱ्हेने, प्रत्येक तऱ्हेचं क्षेम घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्त्व जागृत होतं आणि महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा.

महालक्ष्मी म्हणजे हे सर्व जे काही तुम्हाला मिळालेले आहे, हे मिळालय आता, माताजी आम्हाला कळलं आहे. परमेश्वराचा आमच्यावर हात आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत. पण अजून थोडसं आम्हाला कमी वाटतंय.’ ‘काय बुवा, काय कमी वाटतंय?’ ‘अजून आम्ही कोणाला दिलं नाही. वाटून खाल्लं नाही. एकटेच खात बसलो आहोत.’ महालक्ष्मी तत्त्व तुमच्यात जागृत होईल आणि हे जागृत झाल्यावर बरोबर तुम्ही संतुलनात, असंतुलनात नाही. संतुलनात हळूहळू आपली दीपशिखा वाढवली तर ती ब्रह्मरंध्रात जाऊन बसेल आणि सबंध तुमचं आयुष्य आलोकित होईल. आजपर्यंत कोणीही जगात झाले नाहीत असे महापुरुष तुमच्यातून निघणार आहेत. आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत आणि जाणले नाहीत, असे महाकिमयागार तुमच्यातून निघणार आहेत. पण संतुलन नाही सोडायचं. पण जर तुम्ही संतुलन सोडलं तर हे प्रेम जे आहे, ते इकडे पडेल, नाहीतर तिकडे पडेल. नष्ट होईल. संतुलनात तुमची दीपशिखा उघडायची आहे आणि हे झालं पाहिजे, मग ह्या सगळ्याला अर्थ येतो. हे जे आवाज होताहेत आणि हे ध्वनी निघत आहेत ( फटाक्यांचे आवाज), ही त्याचीच गर्जना आहे. हे होणार आहे. कडकडणार आहे सबंध जग. दंदुभी वाजणार आहेत आणि सगळ्यांना कळणार आहे की एक नवीन संताप राहणार युग तयार होत आहे. त्या माणसात, त्याच्यात, कोणालाही, कोणत्याच प्रकारचा त्रास, त्रागा, नाही. आणि परमेश्वराच्या साम्राज्यात त्याचे चमत्कार बघावे तितके थोडे आहेत. बघतच रहावं आणि काय बोलणार हे पाहिल्यावर! अशी एक अत्यंत सुंदर मनःस्थिती होते. त्या आनंदाचा उपभोग तुम्ही सर्वांनी सतत मिळवावा. त्या सदिच्छेनेच मी इथे आज या पूजेला तयार झालेली आहे. मला पूर्ण आशा आहे, की आजच्यानंतर सर्व लोक मनोभावे आपल्यातील लक्ष्मी तत्त्व जपून ठेवतील. आणि त्यातून उगवणाऱ्या ह्या नवीन आकांक्षा ह्या महालक्ष्मी तत्त्वाच्या रूपाने बाहेर पडतील. त्या संतुलनात राहून पूर्णपणे समजून घेतील. व्यवहारात आणतील आणि पसरतील. परमेश्वर आपणा सर्वांना ही दिवाळी सुखाची करो! सगळ्यांना माझ्यातर्फ अनंत अनंत आशीर्वाद!