Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या साम्राज्यात यावे. ज्यासाठी मोठे आमंत्रण आपल्याला दिलेले आहे.   सगळी आवभगत आहे. अत्यंत प्रेमाने बोलावलेले आहे. पण त्यातही अनाधिकार चेष्टा होते. तेव्हा त्या अनाधिकार माणसाला, त्या व्यक्तीला सहजयोग लाभेलच असे सांगता येत नाही. थोडा अधिकार असावा लागतो, आईवरसुद्धा. आपणच आपले अधिकार स्वत:च जमवून बसलेले आहेत. ते सहज आहे. ‘स’ म्हणजे आपल्या बरोबर. ‘ज’ म्हणजे जन्मलेले ते अधिकार आपल्याबरोबर जन्मलेले आहेत. या योगाचे अधिकार आपल्या बरोबर जन्मलेले आहेत. 

पण जशी एखाद्या साम्राज्यात येऊन आपण आपले नागरिकाचे अधिकार गमवतो तसेच आपणसुद्धा काही काही अधिकार गमावलेले आहेत. तर ते स्थापित करावे लागतील. ते करायचे काम आमचे आहे. जसे पुण्याला काल आम्ही बघितले, तर गणेश तत्त्व मात्र फारच दुःखात आहे. म्हणजे जागृतच होत नव्हतं. आता बघा! पुण्य हे गणेशाचे प्रसाद रूप आहे. म्हणजे आपल्याला गणेशच पुण्य देतो. पुण्य संपदा आपली जी होते ती आपल्या कुंडलिनीमध्ये असते आणि तो संचय सबंध गणेश, म्हणजे आपल्यामध्ये जे गणेश तत्त्व आहे ते सगळे आकलन करून तिथे, ती संपदा आहे. तेव्हा तुम्ही कितीही पुण्यसंचय केला आणि त्याठिकाणी गणेशच ठीक नसला, आता या जागेतच गणेश खराब करून ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे कोणी खराब केला ते. तर इतके वातावरण दूषित झालेले आहे, की तुमची पुण्याईसुद्धा त्या गणेशाला आकलन करता येत नाही. जर घाणीत दूध घातले तर ते हंसालासुद्धा जमायचे नाही, की नीर-क्षीर विवेक कसा करायचा. अशातला हा प्रकार आहे. तेव्हा जे लोक असले वातावरण दषित करीत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे विरोध करायला पाहिजे. मनातूनच नाही तर पूर्णपणे विरोध करायला पाहिजे, की आम्हाला आमचे गणेश तत्त्व खराब करणारा मनुष्य इथे नको. त्याबद्दल जर तुम्ही तटस्थ भावना घेतली तर तोही तुमचा दोष आहे. काल आता फार मनवून त्या गणेशाला जागृत केले. म्हणजे गणेश तत्त्व हे सगळ्यात शेवटले आहे. फारच सहनशील आहे ते तत्त्व. फार मुश्किलीने नष्ट होते ते आणि ते मुख्य मुळावर बसलेले असते. ते सुद्धा यांनी आत घातलेले आहे आणि तुमच्या डोळ्यादेखत हे सगळे होत आहे. त्याला सत्कार नको, त्याला कोणीही नको. सगळ्या सहजयोग्यांनी जर ठरवले तर त्याला काहीही वेळ लागणार नाही. तेव्हा गणेश तत्त्व आपल्या इथले, पुण्यातले खराब झालेले आहे. तेव्हा बघा केवढा मोठा घाला आहे सहज योगावर.

तेव्हा काल गणेशाला मनवून, समजावून जागृत केले आपल्या सगळ्यांमध्ये. ते जागृत झाल्यावर बरेच लोक पार झाले. आता असे पण म्हणाल, की ‘आम्ही काही तिकडे गेलो नाही माताजी. आम्हाला त्याच्याबद्दल विरोधच आहे. आम्ही त्याचे तोंडसुद्धा पाहिले नाही, तरी आमच्यातले गणेश तत्त्व का खराब होतंय ?’ जे विहिरीत असेल ते येणारच. त्यामुळे इथले जे गणेश तत्त्व खराब झालेले आहे त्याची जबाबदारी इथल्या सहजयोग्यांवर आहे, पहिली गोष्ट, हे लक्षात ठेवले पाहिजे. ते कसे नीट करायचे ? गणेशाची कशी स्थापना करायची ? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारून घ्याव्यात किंवा या लोकांना माहिती आहे, त्या कशा रीतीने स्वच्छ करायच्या. प्रत्येक सहजयोग्यांमध्ये गणेश हा उद्भवला पाहिजे. इतकेच नाही पण जागृत होऊन स्थित झाला पाहिजे. आमच्याकडे काही काही खरेच असे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये गणेश पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि गणेश तत्त्वांनीच आम्ही कुंडलिनी जागृत करतो. कारण गणेश जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येणारच नाही. त्याने हो म्हटल्याशिवाय कुंडलिनी वर येणारच नाही आणि ते तत्व  जिथे कमी पडेल तिथे कुंडलिनीचे कार्य हळू चालेल. कालसुद्धा जोर कमी होता. त्याला गणेश तत्वाचा जोर पाहिजे. तेव्हा पुण्याच्या सहजयोग्यांना माझे असे म्हणणे आहे, की गणेश तत्वाला आपल्याकडे बळकट केले पाहिजे. तर ते कसे करायचे मी सांगते कारण हितगुज आहे म्हणून. प्रथम गोष्ट म्हणजे अशी, की हे पावित्र्याचे व्रत आहे. तर गणेशाला जे दोष होतात ते पहिले डोळ्यापासून होतात. गणेशाचा अगदी डायरेक्ट संबंध डोळ्यांशी असतो आणि हे गणेश तत्व जे आहे तेच पुण्यातून लुप्त झालेले आहे. त्यामुळे त्याच्या मधोमध जिथे ऑप्टिक नर्व्हज् क्रॉस करतात, तिथे आज्ञा चक्राचे स्थान आहे आणि आज्ञा चक्र हे गणेश तत्त्वाचे प्रकटीकरण आहे. मॅनिफेस्टेशन आहे. तेव्हा गणेश तत्त्च जर खराब झाले असेल तर आपल्या डोळ्यातून काही तरी चूक झाली असली पाहिजे हे लक्षात आणले पाहिजे. म्हणजे प्रथम हे जाणले पाहिजे, की गणेश तत्त्व हे पृथ्वी तत्त्वाचे बनवलेले आहे. आपल्याला माहिती आहे, की अंगावरचा मळ काढून गौरीने गणेशाची स्थापना केली होती. म्हणजे पृथ्वीतत्त्व सबंध व्हायब्रेट करून त्याचा गणेश बनविलेला आहे. 

पृथ्वी तत्व हे फार पवित्र आहे आणि त्याची शक्ती शोषून घेण्याची आहे. इतके कोणतेच तत्व शोषण्यामध्ये सशक्त नाही . इतके पृथ्वी तत्व. पृथ्वी ही आमची आई आहे. तुमची आजी आहे.  त्यामुळे तुमचे आणखी डबलचे नाते आहे त्यांच्याशी. ती तुमची आजी, तुमच्यातले सगळे दोष ओढू शकते आणि तुमच्यामध्ये गणेश तत्व घालू शकते. त्यासाठी आधी आपले डोळे ठीक करायला पाहिजेत. नेहमी डोळे (दूष्टी) जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. हिरवळीवर आपली नजर असायला पाहिजे किंवा चालतानासुद्धा हिरवळीवर चालले पाहिजे. सकाळी उठून जर दव असेल तर त्याच्यावर चालले, तर त्यानेसुद्धा डोळ्यांना शांतता मिळते, पण डोळे नेहमी खाली असले पाहिजेत. परत डोळ्यांची हालचाल फार केली नाही पाहिजे. प्रत्येक वेळी काही झाल्यावर आपले लक्ष असे किंवा असे फिरवायला नाही पाहिजे. तर काय असेल ते विचार करून नंतर डोळे फिरवायचे हळूच आणि बघायचं. फार ज्या लोकांची डोळ्यांची हालचाल होते त्यांचे गणेश तत्व खराब होते. आता आपल्याकडे ज्याला आपण फ्लर्टिंग म्हणतो हा त्यातलाच प्रकार आहे की प्रत्येक बाईकडे बघितलेच पाहिजे! आणि जर नाही बघितले तर माना वळवून वळवून मागे बघायचे! अशा काही काही घाणेरड्या पद्धती आज काल निघालेल्या आहेत. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमचे भाऊ वगैरे कोणी होते त्यांना ताकीद असायची, की डोळे खाली करून चालायचे. म्हणजे अजूनही त्यावेळची जी मंडळी आहेत त्यांची ही ओळख आहे, की चालतांना ते मान वर करून  डोळे असे इकडेतिकडे करून चालत नाहीत. पूर्वी त्याला वेंधळा म्हणत असत. वेंधळ्यासारखे चाललेत इकडेतिकडे बघत. नजर खाली जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. आपल्याला लक्ष्मणाचे उदाहरण आहे, सीता ही त्याची वहिनी, आता वहिनीबरोबर थट्टा वर्गैरे पण आपण करतो. तो तिच्याशी बोलतानासुद्धा तिच्या पायाकडेच बघायचा. वर बघायचाच नाही. इतकी त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे. तर दृष्टी पायाकडे असली पाहिजे. त्याच्यावर बघायचे नाही. जर कोणी बोलले व विचारले तर मात्र हळूच डोळे वर करून बघायचे, भक्तीने आणि श्रद्धेने ही डोळ्यांची हालचाल सहजयोगाला फार मदत करते.

आमचे लंडनचे लोक-आपल्याला माहिती आहे, त्याबाबतीत काय त्यांची स्थिती झालेली आहे. किती कुचंबणा झालेली आहे. त्यातले थोडेच इथे आल्याबरोबर तुम्हाला एवढा त्रास झाला. तिथे सगळेच तसे आहेत. त्यांना गुरु कशाला लागतात हेच मला समजत नाही. या माणसाला शंभरदा शिकवतील असे सगळे घाणेरडे ज्ञान त्यांच्याजवळ आहे. तर त्यांच्याजवळ हे नाहीच. अगदी त्यांचे गेलेले आहे. तरी सुद्धा पृथ्वी तत्वावर मेहनत करून त्यांनी आपल्यावर फार कमवून घेतलेले आहे. दुसरे, पृथ्वी तत्वावर उभे राहून पायावर पाणी घालून घ्यायचे, दोन्ही हात आकाशाकडे असे करायचे किंवा असे करून आमचेही नाव घेतले तरी चालेल. तर ती पृथ्वी सगळे पाण्यातून ओढून घेते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी मोकळे वाटेल. तसेच पृथ्वीवर झोपणे, तिला नमस्कार करणे, तिची क्षमा मागणे, ‘तुला आम्ही पायांनी स्पर्श करतो म्हणून क्षमा कर.’ पृथ्वी तत्वाला जागृत केल्याबरोबर आपल्यातला जो गणेश , ते इसेन्स आहे. जे त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्वाचे जे धारणेचे तत्व आहे, म्हणजे धारा जेवढी आहे जगात, ती सबंध श्री गणेशामुळे आहे आणि ही धारणा  त्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, हे सगळे श्री गणेशाचेच प्रकटीकरण आहे. पहिल्यांदा धारणा झाल्याशिवाय , काहीही होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा श्रीगणेशाला पूजल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आठही विनायक इथे आलेले आहेत. हे केवढे मोठे आहे! पण तिथेसुद्धवा घाण! परवा येतांना आम्ही गेलो होतो, रांजणगाव गणपती, व्हायब्रेशन्स त्यांचे अगदी मंद! फार कमी! तरी मागच्या वेळेस जागृत केले. परत गेलो तिथे, सर्वांसाठी क्षमा मागितली. आम्ही भक्तही होतो तुमच्यासाठी, की ‘जाऊ दे, त्यांना समजत नाही. तुम्ही फार मोठे आहात. तर यांच्यामध्ये जागृत व्हा. तुमचे काही विचारायला नको. तुम्ही फार शुद्ध तत्त्व आहात, पण या लोकांना काही समजत नाही. अजून अजाण आहेत, तेव्हा यांना क्षमा करा.’ आणि तिथे घाणेरडी सिनेमातली गाणी त्यांच्यासमोरच लावलेली. आता काय म्हणावे या प्रकारांना! हे तांत्रिक प्रकार आहेत. देवासमोर घाण करायची. म्हणजे तिथे भुते येतात. त्या भुतांना वापरायचे. नाव घ्यायचे संन्याशाचे की आम्ही संन्यास घेतो आणि घाण करायची. जे संन्याशाला शोभत नाही तसे वागायचे. म्हणजे इथून जे काही सन्य सत्व म्हणजे त्यातले तत्व असते ते निघून जाते. ते निघून गेल्याबरोबर तिथे भुते येतात. भुतांचे राज्य अशा रीतीने परमेश्वराला काढून तिथे करतात.

 तेव्हा ते लक्षात आणलं पाहिजे , की आमच्या फोटोवरसुद्धा कधी कधी काळी छाया आलेली आम्ही पाहिली आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आमचे चित्त तिथून गेले ! नाहीच आम्ही तिथे. फोटो असूनसुद्धा. म्हणजे फोटो इतका साक्षात आहे, पण त्याच्यावरती काळी छाया येते. त्याचे कारण त्या फोटोसमोर काही तरी घाणेरडे प्रकार होतात किंवा कोणी त्याच्यावर काहीतरी आरोपण केलेले आहे किंवा काही. तर आमचे स्वत:चे तसेच आहे. तसे सगळे चांगले आहोत आम्ही. फार छान आहोत, पण पटकन चित्त निघून जाते. तिकडे लक्षच जात नाही आमचे. म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही, किती ही प्रयत्न केला आपले चित्त लावायचा  तरी चित्त लागणार नाही. तिथून निघूनच जाणार. लोक म्हणतात, ‘ते एवढे मोठे मंत्री आहेत माताजी, असे काय करता!’ ‘पण त्यांना आम्ही भेटणारच नाही. कसेही करून जमायचे नाही.’ ‘ती एवढी मोठी माणसे आहेत, त्यांना भेटलेच पाहिजे, असं तसं.’ ‘ते काही जमायचे नाही, रुळायचे नाही. ते काही आम्हाला झेपायचे नाही, असेच काही तरी होणार.’ तेव्हा परमेश्वराचे चित्तसुद्धा फार पवित्र आहे. आणि थोडीबहुत अपवित्रता चालते.  एखाद्या माणसाला फार स्वच्छतेची आवड असेल आणि त्याला तुम्ही घाणीत उभे रहा म्हणाल, तर तो राहील का? तो काही घाणीशी झुंझत बसणार नाही. तिथून निघून जाईल. नको ते नको.

असे ते पवित्र तत्व आहे गणेशाचे आणि त्यामुळे जरी ते इतकं सहन करतं. तरीसुद्धा त्याचे चित्त हटते. म्हणून इथल्या सहजयोग्यांची ही विशेष जबाबदारी आहे, की त्यांनी गणेशाचे तत्त्व वसवले पाहिजे. याचा अर्थ असा असतो, की लोक गणेशाची मूर्ती विकत घेऊन येतात आणि घरी आणून पूजनाला बसवतात. पण ती आपण विकत आणू शकत नाही कारण ज्या माणसाकडून आपण विकत आणली त्याने कोणत्या मनाने ती मूर्ती बनवली? त्याला व्हायब्रेशन्स होते का ? त्याने कुठून माती आणली? त्याने पैसे घेतले त्याचे परमेश्वराला विकले त्याने. काय हे! अहो, परमेश्वराला विकता येते का? आपण मूर्ती विकत कशी घ्यायची? तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकता का? ‘मग आम्ही गणपती बसवलाय माताजी  घरात.’ ती मूर्ती बघायला पाहिजे, तिची चक्रे बघायला पाहिजे, तिचे एकंदर सगळे सूत्र बघायला पाहिजे आणि फारच कमी अशा मुर्त्या असतात. अगदी फारच कमी! माझ्याकडे फक्त एकच गणपती आहे, फक्त एकच! एकदा आम्ही सांगलीला गेलो होतो. तिथे आमचे फार मोठे शिष्य आहेत. त्यांनी स्वतः हाताने बनवून दिलेला आणि तोही लाकडाचा आहे. आणि मी म्हटले तो शेणात बसवावा, गाईचे शेण असते, त्याचा रंग मातीसारखा जसा असतो, तसा अगदी फार सुंदर गणपती आहे. पण तो एक गणपती मी पाहिला. तो इतका सुज्ञ आहे, इतका सुज्ञ आहे,  इतकी व्हायब्रेशन्स त्याला आहेत! एकदा आमच्याकडे लंडनला एक गृहस्थ मला भेटायला आले आणि त्यांना वाटले आधी सरळ वर जाऊन गणपतीचे आपण दर्शन घ्यावे. म्हणून वर गेले  आणखी तिथे जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. पण काही व्हायब्रेशन्स   नाहीत त्याला. ते घाबरले. चपापले की ‘मला काय झाले ? मला एवढे व्हायब्रेशन्स येत होते. मी वर येऊन या गणपती समोर आलो, तर गणपतीला व्हायब्रेशन्स कां नाहीत. झाले तरी काय?’ शेवटी मग विचार करीत बसले, की काय झाले. तर त्यांना सुबुद्धी सुद्धा गणपती देतो. तर अशी सुबुद्धी आली, की ‘अजून  मी माताजींना नमस्कार केला नाही, तर गणपतीला ते पटले नाही. आधी त्यांना नमस्कार करून यावा. कारण गणपतीला आईशिवाय दूसरे काही नको. खाली धावत आले आणि कांन  धरून माझे पाय धरले, ‘माताजी, तुम्ही आतमध्ये होता. क्षमा करा!’ आणि परत वर गेले तर झर झर झर व्हायब्रेशन्स यायला लागले. त्यांनाही क्षमा मागितली.

 गणपतीला आईशिवाय शिवसुद्धा सुचत नाही. काहीही सुचत नाही. एकच तत्व  माहिती आहे, आई आणि तिची शक्ती. त्यामुळे ते एवढे प्रचंड आहेत आणि त्यांना सगळे देव देवता पूजतात. शिव शंकर हे की सगळ्यात आम्ही म्हणायचं  शेवटी राहतात आणि सदासर्वदा असतात, ते सुद्धा श्रीगणेशाला पूजतात. मग इतर, ब्रह्मदेव, विष्णू यांचे काही म्हणायला नको. आणि महाराष्ट्रात याचे फार वरदान आहे. गणपती काय ते आपल्याला समजते आणि नेहमी गणपतीचे वर्णन आपल्याकडे फार आहे आणि गणपतीला आपण मानतोही. असा महाराष्टीयन  विरळाच ज्याला गणपती माहिती नाही. तेव्हा आधी गणपतीची पूजा झाली पाहिजे व्यवस्थितपणे. आणि मी तरी काल हाच विचार केला, की पुण्याच्या सहजयोग्यांना काय सांगायचे. विशेष, नवीन. तर ते हे की, श्री गणेशाला पावन करून घ्या. स्वत:मध्ये बसवून घ्या. गणेशतत्व ओळखून घ्या.

 आता एक गृहस्थ सांगलीहून आले होते, त्यांच्यात गणेश तत्व फार चांगले आहे . बाकी लिव्हर जरासे बिघडलेले आहे , पण गणेश तत्व फार जबरदस्त आहे. त्याचा मला फार आनंद झाला. तसेच आमचे धुमाळ साहेब आहेत. हे काय आता खेडेगावात राहतात. नेहमी जमिनीशी संबंध, तर शेतकरी लोकांचा फार मोठा वारसा आहे, की नेहमी गणपती त्यांच्यावर प्रसन्न असतात. त्यामुळे आम्ही आधी खेडेगावात काम सुरू केलेले आहे. कारण तिथे पहिल्यांदा होणार. जिथे गणपतीचे पुजारी असतील तिथे आमचे पहिल्यांदा होणार. म्हणजे ते बसून गणपतीला पूजत नाहीत पण त्यांच्यातला जो गणपती आहे तो जागृत आहे. जितके माणसाला कृत्रिम जीवन मिळत जाते तितके तितके हे कमी होत जाते. तर पहिली गोष्ट आपला गणपती ठीक केला पाहिजे. त्यासाठी काय काय करावे लागेल, पुढे कशी कशी साधना करावी लागेल, ते तुम्ही आमच्या इतर सहजयोग्यांना विचारा. पण जर आम्ही लंडनच्या सहजयोग्यांना,  गणपती त्यांचा जागृत झाला तर तुमचा होणारच. त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यानंतर शक्त्या किती वाढतात. आणि जोर कुंडलिनीला किती येतो ते बघण्यासारखे आहे. तेव्हा अशा गणपतीला नमस्कार करून, मी आता पुढचे सांगते, सहजयोगाबद्दल. 

सहजयोग काय आहे ते आपल्याला माहिती आहे. पुष्कळ माहिती आहे. इथे सगळे सहजयोगी बसलेले आहेत. तेव्हा त्यांना सांगायला नको. आता एक मोठा प्रश्न. प्रश्न कालही होता आणि आजही थोडा बहुत आहे की असे सहज का घडते? पण हा इतका विक्षिप्त प्रश्न आहे, की आता आम्ही या माईकमधून बोलतोय. इथे खेडेगावातले कोणी आले असेल आणि त्यांनी माईक पाहिला नसेल तर ते म्हणतील असे कसे शक्य आहे, की तुम्ही तिथे बोलता आणि ते इकडे येते. एखाद्या खेड्यातल्या माणसाने जर कधी लाईट पाहिला नसेल, त्याला जर घरात बोलावले आणि दिवा मालवायला सांगितले तर तो नुसता फुंकत राहणार. ‘अहो, विझतच नाही, कसे करायचे.’ जसे इकडे बटन दाबल्यावर तिकडे उजेड, तर तो बघतच राहणार, की हे असे कसे होते? तिकडे बटण दाबले आणि इकडे उजेड! तशातला हा वेडेपणाचा प्रश्न आहे, अगदी फार वेडेपणाचा कारण सूर्यामुळे  आपल्याला माहिती आहे, जेव्हा सूर्य आकाशात येतो तेव्हा क्लोरोफिल म्हणून एक पदार्थ वनस्पतीमध्ये तयार होतो. त्यामुळे त्याला हिरवा रंग येतो. सूर्य कुठे आहे हजारो मैल दूर. तो आकाशात आल्याबरोबर ही घटना घडायला सुरुवात होते. जर तुम्हाला सांगितले, की या पानाला हिरवा रंग दे, तर तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे वरून ओतू शकता पण आमूलाग्र आतून बाहेरून असा तुम्ही देऊ शकत नाही. पण जेव्हा तो सृष्टीच्या प्रत्येक पानाला रंगवतो असा सूर्य किती प्रचंड असला पाहिजे. पण त्याबद्दल आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. कौतुक वाटत नाही. ज्याला इंग्लिशमध्ये ‘टेकन फॉर ग्रँटेड आहे’  की , तो आला म्हणजे होणारच, असे म्हणतात. जगात इतकी फळे कशी लागतात, रात्रीच्या रात्रीत कशी होतात. आपण त्यांची वाट बघत नाही. कशी ही झाडे मोठी होतात काही समजत नाही. त्याचे काही मोजमाप नाही. हे सगळे सूर्य कसे घडवून आणतो एकटा. त्याच्या किरणांमध्ये किती प्रकारच्या शक्त्या आहेत, तेव्हा एकटा सूर्य घडवून आणू शकतो. यावरून आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे जर आमच्याकडून हे घडत असेल तर काही तरी आमच्यातही असले पाहिजे. एवढा तरी अंदाज लावला पाहिजे. याच्या उलट असं कसं होईल म्हणून बसले, तर मात्र, ही कोणती पद्धत आहे म्हणजे याला मी माणशी पद्धत म्हणते कारण परमेश्वराची पद्धत वेगळी असते. याला मी माणशी पद्धत म्हणते, म्हणजे उलटीकडून काहीतरी बघायचे आणि म्हणायचे तुम्ही लोम्बकळ्ले  कसे? म्हणजे विनोदी आहे हे सगळे. तुम्ही सगळीकडे लक्ष देऊन  बघा, की असले प्रश्न आपण विचारतो तरी कसे, म्हणजे होताना दिसतय! 

आता तुम्हाला कुंडलिनी बघायची असली तर आम्ही दाखवू. त्याचे स्पंदन दाखवू, त्याचं  चढणं दाखवू  त्याचे वर उठणे दाखवू, पण तरी लोक तुम्हाला असे प्रश्न विचारतील, तेव्हा मग काय करायचं? त्यांच्याशी कसा वाद घालायचा ? हा सहजयोग्यांच्यासमोर प्रश्न असतो. श्री माताजी असा प्रश्न विचारला तर त्याचे काय उत्तर द्यायचे. आता थोडा वेळ असे लक्षात घ्यायचे, की जर थोडे वेडे असले तर त्यांना ठीक करता येते. अगदीच वेडे असले तर त्यांना नमस्कारच केलेला बरा! त्याच्यासाठी डोकेफोड कशाला करायची. काय म्हणजे आपण ही वेडे व्हायचे त्यांच्याबरोबर. तेव्हा सुज्ञपणा असा घ्यायचा की ‘ठीक आहे, बघू या, बघू या.’ असे म्हणून टाळून द्यायचे. पण तसे होत नाही, थोडे असे मनुष्याला वाटते, की आपल्याला मिळाले तर झालेच पाहिजे, कसेही असले तरी केलेच पाहिजे. मग ते झेपत नाही आपल्याला. तेव्हा आधी जी साधी अक्षरे आहेत ती समजून घ्या. आणि सोडवून घ्या. साधी माणसेसुद्धा पुष्कळ आहेत पुण्यात. पुष्कळ आहेत, बहुतेक साधी आहेत. पण कठीण जास्त बोलणार, कठीण पुढे पुढे करणार, कठीण जो आहे त्याचे मात्र तो करून घेणार. ‘आम्ही मुद्दामून आलो’ म्हणे! आता आले कशाला मग म्हणजे हे तरी काय सांगायचे झाले, आम्ही माताजी मुद्दामून आलो! म्हणजे येतात असे इकडे सहज निघाले होते काही तरी करायला, तर इकडे पोहोचले की काय! अहो, मुद्दामूनच येतात. पण त्याचे महत्त्व. आम्ही मुद्दाम होऊन आलो .काही तुम्ही विशेष काही प्रयास करून आलात , असं नाही .आम्ही मुद्दामहून आलो .तेव्हा मला म्हणायचं असं की माणसाची बुद्धी जी असते ती, इतकी वर वर आहे, की  त्याला आतमध्ये ओढायला काही तरी मार्ग पाहिजे न . आता तुमचे चित्त माझ्याकडे आहे. आता एखादा मनुष्य तुमच्याशी वाद घालतो आहे, काही तरी बोलतोय, तर त्या माणसाला चूप कसे करायचे? त्याचे चित्त, जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसे आणायचे, हा जर मुख्य तुम्ही मार्ग शिकलात तर फार उत्तम सहजयोगी व्हाल. त्यांनी काही तरी बोलायला सुरुवात केली, तर आपण तिकडे लक्ष घालायचे नाही. त्याला हाताने बंधने द्यायची. नाही तर चित्ताने देता येतात. आणि लगेच कुंडलिनीवर लक्ष. तो तिकडे बोलतोय आणि आपण कुंडलिनीवर हात करायचा. की ती कुंडलिनी लागली चढायला आपली वर. कारण आपल्या नजरेतच आहे कुंडलिनी. आपण आतून चित्त घातले, चित्तारूढ आहात तुम्ही. खरोखर चित्तारूढ आहात. तुम्ही फक्त चित्त त्याच्या कुंडलिनीवर ठेवायचं. तो काय बोलतोय तिकडे नाही लक्ष ठेवायचे. ती कुंडलिनी लागली सरकायला वर, की सगळी चक्रे दिसायला लागतात बरोबर. कुठे रुतली, कुठे झालं हे प्रॅक्टीस करून येतं. थोडेसे प्रॅक्टीस करायचे. प्रत्येकाच्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचे आणि चढवण्याचा प्रयत्न करायचा. बसमध्ये बसले तर, ट्रेन मध्ये बसले तर, कुठेही लोक दिसले की  आधी बघायचे कुंडलिनी कुठे आहे ती.

 आता आमच्या लंडनला एक प्रथा आहे. हात ‘शेक’ करायचा. म्हणजे भयंकर प्रकार असतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे अर्धा शेर रक्त ओढणार नाहीत तोपर्यंत तुमचा हात ‘शेक’ केला, असे त्यांना वाटतच नाही. असे अगदी लोक ‘शेक’ करतात. दारू प्यायल्यानंतर ‘शेक’. पण दारू पितांना, त्याच्या आधी जातांना लोक शेक करतात. तेव्हा मी जागृती देते त्यांना. त्यांनी शेकिंग हँड केले की मी त्यांना जागृती देते. मग कमी पितात. हळूहळू आता त्यांचे पिणे कमी होऊ लागले आहे. आणि आमच्या नशिबात हेच आहे, की पाच-पाचशे लोकांशी शेकहँड करायचे. उभं राहून .निदान, तिसऱ्या, चौथ्या दिवशी हे प्रसंग घडतात. पाचशे लोक चालले आहेत नं, मग आमचा हात चालला त्यांच्या बरोबर. आता ही पद्धत म्हणजे सहजच निघालेली आहे. तिथल्या लोकांना शेकहँड केल्याशिवाय कुंडलिनी वर हात घालताच येणार नाही आम्हाला. थोडा वेळ मनुष्य थांबतोही. हात शेक केला की झालं. तर आपण त्यांच्या कुंडलिनीवर लक्ष द्यायचे, आणि कुंडलिनी वर काढायची. लगेच आपल्याला, हळूहळू प्रॅक्टिसने लक्षात येईल, की कुठे कुंडलिनी अडकलेली आहे. लगेच तिथले नाव घ्यायचे. याचेही शास्त्र आहे. ते समजावून घेतले पाहिजे. आमच्या लंडनला या लोकांची व्यवस्था फार चांगली आहे. प्रत्येक चक्रावर काय मंत्र आहे, काय त्यांचे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, कुठे काय तुटलेले आहे, कुठे काय आहे, ते सगळे काढलेले आहे आणि ते सगळे कागदावर लिहून एक फोल्डर तयार केलेले आहे त्या लोकांनी. एक फोल्डर यांच्याकडे आहे, तसे फोल्डर काढून घ्या. ते इंग्लीशमध्ये आहे, तुम्ही मराठीत करून घ्यायचे. ते सगळे शिकून लक्षात ठेवायचे.

 आता जी कामगिरी करायची असते ती अगदी गुप्तरीत्या होते. जर मनुष्य तुम्हाला ठीक वाटला, जर त्याची एक दोन चक्रे असतील तर सुटतील. जागृती मात्र द्यायची त्याला. जागृती दिल्यावर काही विशेष बोलायचे नाही. त्याला स्वत:लाच वाटेल आम्ही भेटायला येऊ बरं का. कसे काय तुमचं , ठीक आहे वगैरे. हळूहळू ते सरकवत जायचे कारण साधारणपणे फार चिकित्सक बुद्धी असते. तुम्ही जर एकदम घाला घातला, की ते चालले. आधी हळूच एखादी वस्तू काढून घ्यायची असली म्हणजे कसे आपण अलगद काढतो, तसे काढायला लागते. कारण फार सूक्ष्म आहे ते. लोकांना जर तुम्ही काही विशेष सांगायला गेलात की ते घाबरतात. तेव्हा सहजयोगी मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे, की हे फार सूक्ष्म आणि नाजूक काम आहे. माणूस इतका खराब झाला आहे, की त्याच्यावर काही प्रयोग करण्याआधी त्याची संमती घेणेसूद्धा फार कठीण काम झालेले आहे. पण जागृती त्याला त्याच्या संमतीशिवाय तुम्ही देऊ शकता, पार मात्र तो होऊ शकत नाही. पार करायला मात्र त्याची संमती पाहिजे, त्याचा अधिकार आपल्याला घेता येत नाही. जागृतीमुळे त्याची प्रकृती ठीक होईल, त्याला परमेश्वराकडे जावेसे वाटेल, ओळख पटेल पण जागृती होणे आणि पार होणे याच्यात फरक आहे. कुंडलिनी जागृत झाली तरी जोपर्यंत ती पार झाली नाही आणि पूर्णपणे स्थित झाली नाही, तर स्थिरावत नाही, तेव्हा या स्टेजला आणण्यासाठी त्याची संमती पाहिजे, पण तुम्ही जर त्याला जागृती दिलेली असली तर मग ती स्टेज यायला काही वेळ लागत नाही. आणि ती स्टेज आली म्हणजे त्यांना पार करता येते.

 तरीसुद्धा मुख्य सांगायचे म्हणजे ही फार हळू गतीने चालणारी गोष्ट आहे. तर आधी ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि जे तुम्हाला मानतात, अशा लोकांना हाती घेतलेले बरे. कारण नाही तरी हेच एक द्यायचे असते जगात. दुसरे काही नाही. तुम्ही कुणाला आपल्याकडे जेवायला बोलावले तर काय उपयोग आहे त्याचा? मी असे लोक पाहिलेले आहेत, त्यांनी जगासाठी इतके काही केले, त्यांना वाटले आम्ही लोककल्याणार्थ हे कार्य केलं, आणि ते कार्य केले, इतके पैसे दिले लोकांना आम्ही. चांगलं त्याचं भलं केलं, पण काहीही लोकांच्या लक्षात राहत नाही. ते जर परत भणंग भिकारी होऊन आले तर लोक त्यांना आपल्या दारात सुद्धा  उभे करत नाहीत. ही लोकांची स्थिती आहे. आपल्याकडे किती लोकांनी देशासाठी त्याग केलेला आहे! लाल बहादुर शास्त्री केवढे मोठे होते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या नावाचे एक तरी स्मारक तुम्ही कुठे पाहिले आहे का? कुठे तरी तुम्हाला दिसतंय का त्यांच्या नावाचं? आणि हे अगदी निर्विवाद आहे. इतर लोकांबद्दल लोकांनी पुस्तके लिहिली, लोकांनी कळवले, की त्यांचे चरित्र चांगले नाही. पण त्यांच्याबद्दल (शास्त्रीजींबद्दल) कोणी असे म्हणू शकत नाही. एवढी मोठी कामगिरी त्यांनी थोड्या वेळात केली पण त्यांच्या  नावाचा एक तरी स्मारक उभारलेले तुम्हाला कुठे दिसते आहे का! परवा त्यांचा फोटो पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले, की त्यांचा फोटो तिथे घातला तरी कसा ? म्हणजे ते पंतप्रधान तरी होते, की नाही अशी शंका लोकांना वाटायला लागेल.

 तेव्हा हे असे होते. त्याला कारण काय ? त्याला आत्म्याची साथ हवी. जागृती म्हणजे आतून घडलेली घटना असल्यामुळे ते अगदी जीवंतसारखे होऊन जाते आतून आणि त्यामुळे त्याची आठवण राहते. हळूहळू ती आठवण विसरू ही शकते. पण तरीसुद्धा आपण ते जागवतो. आता आपण लक्षात घ्यायचं दहा माणसं आपल्याला ज्यांना पार करायचे ते लक्षात घ्यायचे. घरी जाऊन त्यांची नावे लिहून ठेवायची, की ती मंडळी बरी दिसतात. म्हणजे एक तर धार्मिक असावेत. फार कठीण लोक घेऊ नका. म्हणजे दारूडे; दारुङ्यांनाही होते पण आज तशी स्थिती नाही. अशी माणसे जी साधारणपणे धार्मिक आहेत, बॅलन्स्ड आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ज्यांचे परमेश्वराकडे लक्ष आहे आणि जी या मार्गावर आहेत, अशी आठ-दहा माणसे आपल्या हातात घ्यायची आणि त्यांच्यावर मेहनत केली पाहिजे. हळू हळू तुम्हाला आश्चर्य वाटेल, दहा माणसे जर घेतली तर आठ तरी हमखास तुमच्या हाताने पार होणार. प्रत्येकाने दहा जरी पार केले तरी किती पार झाले बघा? मग त्यांच्याकडे सारखं लक्ष ठेवले पाहिजे आणि जोपासना केली पाहिजे, की कुठे आहेत ? काय आहेत ? कुठे निगेटिव्हिटी पकडतात वगैरे. कारण पार झाल्यावर निगेटिव्हिटी कळते, त्याच्या आधी  कळत नाही. मनुष्य वेडा जरी झाला तरी त्याला कळत नाही की आम्ही धरले आहोत. वेडा होऊन पागलखान्यात मरूनही गेला तरी त्याला कळत नाही. पण सहजयोग्याला लगेच कळते आज्ञा धरली. आज्ञा धरली म्हणजे काही तरी आम्हाला चिकटले. त्रास होऊ लागतो, मग लगेच लागले हात फिरायला, आज्ञा काढायला सुरवात. कारण, त्रास होऊ लागतो. ऑटोमॅटिकली. त्याला कारण असे की, जेव्हा तुम्ही अति मानव होता हा महत्वाचा मुद्दा आहे . हा अगदी नोट करून घ्या . हा महत्वाचा मुद्दा असा आहे , जेव्हा तुम्ही मानव  झालात तेव्हा जनावरात आणि तुमच्यात फार मोठे फरक आहेत. त्यातला मोठा फरक हा आहे की घाणीतून जर तुम्ही जनावराला काढले तर त्याला काही वाटणार नाही.. वाटेल ते त्याला चालतं. पण माणसाला तसे केले, तर त्याला नको. त्याला वहाणा पाहिजेत आणि वहाणा असल्या तरी त्याला घाण येते. घरी जाऊन अंघोळ करणार. त्या स्वच्छतेची कल्पना माणसाला आलेली आहे. तसंच आत्म्याच्या स्वच्छतेची कल्पना माणसाला येते आणि म्हणून ‘जे धरले ते नको रे बाबा! हे असे नको! मला सहजयोगच पाहिजे, हे काढून टाका, ते काढून टाका.’ आणि दुखू लागतं. जराशी पकड आली तरी दुखू लागते. आणि मनुष्य ते काढून टाकतो. बरं ते दुखणे म्हणजे असे काही जाज्वल्य नसते. इंडिकेशन येते. बॅरॉमीटर वर येते तसे इंडिकेशन येते की या ठिकाणी या माणसाचे हे धरलेले आहे. तुम्ही काढल्यावर त्याचे सुटते आणि तुमचेही सुटते. काय मजेदार आहे बघा. आता काल यांनी बाजारातून कुंकू आणले. विकत आणलं. मला काय माहित कुठलं कुंकू आहे ? ते कपाळावर लावल्यावर भाजू लागले माझं कपाळ . म्हटले हे कुंकू काढा आधी माझं कुंकू ठीक करा. माझ्या लक्षात नाही आले, इतकी गर्दी होती, त्यांनी हात लावायला सांगितल्यावर माझ्या लक्षात नाही आले आधी, परत लक्ष ओढले गेले. मग ते कुंकू घेतले, व्हायब्रेट केले, मग मी राजवाडे साहेबांना सांगितले , की तुमच्या घरातले कुंकू मागवा, ते चांगलं असतं. मागच्या वर्षातले, ते चांगले होते. इतके बारीक लक्षात येते. मग सगळे व्हायब्रेट होऊन जाते. व्हायब्रेशन म्हणजे ओंकारच आहे. हे ओंकाराचे प्रणव आहे. प्रणव म्हणजे स्पंदन, साक्षात पावित्र्य आहे आणि हे पावित्र्य प्रेम आहे आणि ते सांगत असते, प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. जसा कॉम्प्युटरशी आपला संबंध जुळतो आणि कॉम्प्युटर आपल्याला सांगतो तसा परमेश्वराने हा जो कॉम्प्युटर बसवलेला आहे तो सगळे बारीक सारीक सांगतो. मग त्याच्यावर ओळखले पाहिजे.

  तिसऱ्या  स्थितीमध्ये काही लोक अत्यंत धार्मिक असतात. आता कालचे गृहस्थ महादेवाला फार मानतात आणि त्यांना हार्ट (कॅच) आहे. आता हे कसे शक्य आहे? अहो, त्यांचे (महादेवाचे) स्थान हृदय आहे आणि त्यांच्यावर महादेवच रागावलेले. हे असे कसे होते? लोक विचारतात श्रीमाताजी, ‘आम्ही एवढी महादेवाची पूजा केलेली, मग आम्हाला हार्ट अॅटॅक कसा आला ?’ आता हे म्हणतात चुकीचे आहे. चुकीचे नाही, कनेक्शन नव्हते महणून. आता अशा माणसाने, ज्याने महादेवाची पूजा केलेली आहे त्याने असा प्रश्न विचारायचा श्रीमाताजींना, ‘श्रीमाताजी, तुम्ही महादेवांची शक्ती आहात का ?’ तर उत्तराला म्हणून हातावर व्हायब्रेशन्स सुरू होतील. कारण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही म्हणणारच की, ‘हो, आहे सगळे असेच आहे. काय करता आता ?’ आम्ही आहोत तर आहोत. आता आम्ही आहोत तर कसे सोडायचे ते ? अहो, कोणी काही असला तर त्याला काही त्याचा गर्व असतो का? गर्व त्या माणसाला असतो, ज्याला नसते त्याला! ज्याला असते त्याला कसला गर्व ? आता तुम्हाला बोटे आहेत, नाक आहे, तुम्ही माणूस आहेत त्याचा गर्व आहे का तुम्हाला? तशातला आमचा प्रकार आहे. म्हणजे आमच्यात जे आहे ते आहे, त्याला आम्ही तरी काय करायचे ? आता आमचे प्रधान इतने जुने ट्रस्टी आहेत, पण त्यांना थोडे चिकटले होते. काल, महाशिवरात्रीला उपवास  करायचा नसतो, असे मी म्हटले त्यांना, तर त्यांनी मला विचारले नाही आणि उपवास केला. माझ्यासमोर उपवास करायचा नसतो. मला फार दुःख होते उपवासामुळे. आईला त्रास द्यायचा म्हणजे उपवास करायचा. फक्त नरक चतुर्दशीला आपल्याला उपवास आहे. म्हणजे झोपायचे सकाळी खूप वेळ पर्यंत. अंघोळ वगैरे करायची नाही. त्यादिवशी नरकाचे दार उघडले जाते. त्या दिवशी सकाळी चार वाजता उठून फराळ केला की भुते घुसतात. अहो, काही इतका चूक बसविलेला आहे आराखडा, इतका चूक बसविलेला आहे म्हणजे आश्चर्य वाटते. आता, यांचे सांगते गणपतीचे. यांना प्रॉस्टेटचा त्रास होता. आणि हे म्हणजे चतुर्थीला, उपवास. चतुर्थीला माझ्याकडे आले आणि यांना प्रोस्टेटचा त्रास! मला समजेना हा मनुष्य म्हणजे साक्षात गणपती, आणि याला प्रोस्टेटचा त्रास? कारण प्रोस्टेटचा कंट्रोल वगैरे गणपती करतात. बघा, म्हणजे सहजयोग कसा आहे. ज्या दिवशी चतुर्थी त्याच दिवशी उपवास केलेला. त्याच दिवशी माझ्याकडे आले हे! सगळे समोरच गणित आलेले. हे सहजयोगाचे लक्षण आहे. मी काय चणे, माझा प्रसाद चणेच आहे, मी चणेच काढले. म्हटले, घ्या प्रसाद. ते तर काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या शेजारी जे उभे होते ते म्हणाले, ‘माताजी, आज यांचा उपवास आहे.’ मी म्हटले, ‘आज कसला उपवास.’ त्यावर ते म्हणाले, ‘आज चतुर्थी आहे.’ म्हटले, ‘असं का! तुमच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही उपवास कराल का त्यादिवशी! कुठले शहाणपण ते! कोणाच्या जन्माच्या दिवशी उपवास करायचा हे सूत्रच मला आजपर्यंत कळले नाही. तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही काय सूतक पाळाल का त्या दिवशी! उपवासाचे म्हणूनच त्यांनी सांगितले, की उपास-तापास करायचे नाहीत. कारण इतकं शास्त्र चुकतं त्या उपासाचं. इतके चुकलेले आहे, की मला आता समजतच नाही की यांना सांगायचे तरी काय! माझे असे म्हणणे नाही की तुम्ही नुसतं खातंच बसायचं. तिकडे फार लक्ष असतं या उपासड्या लोकांचं. भयंकर त्रास आहे मला. उपासडे नावाचे. पण लक्षं सगळे खाण्याकडे. म्हणजे, ‘आज काय बेत आहे?’ सकाळी हा पहिला प्रश्न, गणपतीला नमस्कार करायच्या आधी, कारण का तर आज उपवास आहे. मग सगळं घर डोक्यावर घेतलं पाहिजे. उपवास आहे म्हणजे काही तरी विशेष पाहिजे, ते आणा, हे  खायलाच पाहिजे. ते असं झालंच पाहिजे, खाल्लच पाहिजे, म्हणजे हे काय ! उपवास जर सांगितला असेल कुणी – खरं तर सांगितलं होतं का मला माहित नाही – तर तो एवढ्यासाठीच सांगितला होता, की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही राहायचे. त्यासाठी जेवणाची खटखट नको. जेवणाची खटखट जर तुम्ही सुरुवात केली, तर ‘परमेश्वराच्या सान्निध्यात आता आम्हाला जायचे आहे. जेवायला,  तिकडे जायचे आहे. आता आमचं हे कार्य आहे’ वगैरे विचार तुमच्या डोक्यात येतील. म्हणून त्या दिवशी उपवास करायचा म्हणजे ‘पूर्णपणे परमेश्वराच्या सान्निध्यात रहायचं’, असा. पर्यायाने तो उपवास आला. ‘उपवास, म्हणजे परमेश्वराच्या बरोबर सहवास’ असा त्याचा खरा अर्थ आहे, म्हणजे संस्कृतातला अर्थ आहे. आणि त्या उपवासाला पर्यायाने अर्थ हा लागला की उपवास करायचा. पण त्याला आणखी एक मजेदार शब्द आहे ‘उपासना ‘. उपासना करायची म्हणजे ‘उपास ना’. तर त्या उपासाला थोडी तरी तिलांजली द्यायला पाहिजे. आणि बोलणे एकच, आज एकादशी आहे नं, मग काय आणायचं? मग त्याला ते पाहिजे, बटाट्याचा कीसच पाहिजे, अमकं पाहिजे, मग खिचडी पाहिजे. शेंगदाणे पाहिजे. शिंगाडे पाहिजे . आता बाजारात शिंगाडे महाग झाले आज , का तर म्हणे एकादशी . अहो, माणसाचे तत्त्व किती महत्त्वाचे, किती मोठे, किती महान, किती मुश्किलीने बनवलेलं आणि कुठे ते चाललंय! ते कुठे घालता तुम्ही! परमेश्वराच्या चरणावर घालायचं तत्त्व आहे, ते तुम्ही शेंगदाण्यावर घालता! शेंगदाणे खाऊन का परमेश्वर मिळणार आहे ? अहो, साध्या बुद्धिलासुद्धा कसं पटतं हे मला समजत नाही. या धर्मांधतेचा इतका वाईट परिणाम झालेला आहे की त्याचं दूसरे एक पीक निघालेले आहे. तुमच्या मुलाने तुम्हाला वेड्यात काढायचं! दुसऱ्या जनरेशनमध्ये तुम्ही बघा, म्हणतील, ‘आमचे आई-वडील अगदी वेडे आहेत. ब्राम्हणांनी  त्यांना लुटून खाल्लं, उपासांनी त्यांना मारून टाकले, त्यांनी हे केलं!’ कोणाचाही विश्वास परमेश्वरावर राहणार नाही. तिकडून सुटले तर अविश्वासात पडाल.

 परमेश्वर हा आहेच . इतकंच नाही तर त्याची चराचर शक्ती सर्व कार्य करीत असते. यात अगदी शंका नाही. पण ते जाणून घेतलं पाहिजे, त्याचा बोध झाला पाहिजे, जसं मी काल सांगितलं होतं , तसं आपण सहजयोगाने यामध्ये मनन शक्ती वाढवली. आता हे म्हणतात ते खरे आहे. आमच्याकडे अशी पुष्कळ मंडळी आहेत, ज्यांना भाषणसुद्धा  कशाशी खातात ते माहित नव्हतं, नूसते भित्रे. बोलायला लागले तर त्यांच्यात साक्षात सरस्वती वाहते. एक आठ वर्षाची मुलगी होती, इतकी सुंदर बोलायला लागली! लंडनला एक आठ-दहा वर्षाचा मुलगा आहे, तो इतकं सुंदर भाषण देतो सहजयोगावर, की लोकांना आश्चर्य वाटते. इतकं कसं येतं ! माझ्या नातीचं मी सांगते, की ती जवळ जवळ त्यावेळी पाच वर्षाची असेल तर ते लडाखला गेले होते. त्यावेळी तिथे एक लामा गृहस्थ बसले होते. ते मोठं आपलं घालूनबिलून आणि हिंदी बोलतायत माझ्या नाती. तर सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि हिच्या आई-वडिलांनी ठेवल्याबरोबर तिला काही ते पटलं नाही. म्हणजे सहजयोगी ते मोठे! तर ती अगदी उभी राहिली त्यांच्यासमोर जाऊन आणि म्हणाली की, ‘ये चोगा पहन के और सर मुंडा के तुम पार नहीं होते. तो काहे को सबसे छुआते हो जब तुम पार नहीं हो!’ अगदी स्पष्ट बोलली , अगदी कबीरासारखे! कबीरांनी या प्रकारांना असले जोडे मारलेत. तुम्ही कबीर वाचा म्हणजे शक्ती येईल तुम्हाला. कबीर वाचून काढला पाहिजे. त्यांनी सांगितलं जर डोक्याचे केस काढून मुंडन करून, जर परमेश्वर मिळत असेल, तर या शेळ्या आणि ही मेंढरे यांना तर रोजच भादरलं जातं, ती अगदी परमेश्वराच्या जवळच असतील. अशी प्रत्येकाची त्याने काढलीय. हे अंगावर जे मोठमोठे चोगे घालून फिरतात, स्वत:ला मोठे संन्यासी म्हणवतात. दूसरी माझी एक नात आहे, ती हिच्यापेक्षा थोडी मोठी असेल किंवा हिच्या वयाचीच असेल. तिकडे रमण महर्षींचा प्रोग्रॅम झाला होता, तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे असेच मोठमोठाले संन्यासी येऊन बसले होते. असेच एक गृहस्थ शेजारी बसले होते. ते फार मोठे मानले जातात, तर लगेच आमच्या नातीने ते पाहिलं. तिला काही ते सहन झालं नाही. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, ‘नानी, तुम्हारे बगल में जो मॅक्सी पहन के बैठे है उनको भगाओ, बहुत गरम आ रहा है मेरे को।’ अगदी सरळ उठून सांगितलं तिने. आणि तिथे सगळे सहजयोगी बसले होते. त्यांना हसायला आले कारण त्यांनाही गरम येत होते. हा बघायला लागला की कोण मॅक्सी घालून बसलंय. स्वत:लाच म्हणताहेत हे लक्षातच आलं नाही त्याच्या. तर अशी शक्ती आतून प्रचंड येते, की मनुष्य अगदी खरं बोलायला लागतो. भीती वाटत नाही, सत्यावर उभा आहे.

 आता ख्रिस्तांचंच आयुष्य बघा, केवढं पवित्र ते! पण एक वेश्या, तिला सगळे दगड मारतायत, त्यांचा वेश्येशी काय संबंध, साक्षात पवित्र तत्त्व होते ते! पण ‘ती वाईट आहे, वेश्या आहे’ असे समजून जेव्हा तिला लोक दगड मारायला लागले, त्यांनी सांगितले की, ‘बघा, तुमच्यापैकी ज्यांनी काही पाप केलं नसेल त्यांनी दगड मारा आणि तो सुद्धा मला मारा.’ झालं! सगळ्यांचे हात जिथल्यातिथे थबकले. ‘तुम्ही विचार करा, जर तुम्ही कोणतंही पाप केलं नसेल तर हिला मारा.’ मग ती त्यांची फार मोठी शिष्या झाली. ती मारी माग्दालिन म्हणून फार मोठी शिष्या होती. पण आता त्यांचच यांनी घेतलं. आता माणसाचच बघा कसं ते, मला समजत नाही, माणशी डोकं. आमच्या इंग्लिश लोकांचं डोकं आणखीनच वर आहे. मी त्यांना म्हटले, ‘हे कशाला असे मूर्खासारखे वागतात लोक!’ त्यांनी सांगितले, ‘मारी माग्दालिन वेश्या होती आणि तिचा उद्धार झाला म्हणून आम्ही सगळ्या वेश्या झालो आहोत.’ आता काय म्हणावे ! अगदी असे सांगतात त्या. ‘ती जर वेश्या झाली नसती, तर तिचा उद्धार झाला नसता, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत.’ आता याच्यापुढे उत्तर काय? की आपण गाढवाच्या मागे उभे आहोत, हे गाढव आहे हे दिसलं, पण अशा गाढवपणाचे अनेक प्रकार तिथे आहेत. तेव्हा एवढें शिकून आणि आम्ही एवढे अॅडव्हान्स्ड लोक आहोत, हे म्हणून, असे सगळे गाढवच दिसतात मला. आता आपल्याला सांगायला हरकत नाही की ऐंशी वर्षाचे म्हातारे गृहस्थ अठरा वर्षाच्या मुलीला प्रेमपत्र लिहितात. बरं एखादे असे गाढव लिहीत असतील, पण ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येतं. रकानेच्या रकाने रोज ! आता आमचे साहेब म्हणायचे ही वाचा, ‘गीता’ सकाळी उठून. आणि सगळे लोक ते सगळे व्यवस्थित, सिरीयसली वाचतात. म्हणजे सगळेच्या सगळे गाढव असतील, पण ते वाचतात तरी कसे मला समजत नाही. आणि हा सर्रास प्रकार तिथे आहे. ऐंशी वर्षाची म्हातारी अठरा वर्षाच्या मुलाला प्रेमपत्र लिहिते ! असं ऐकलंय का तुम्ही कुठे? म्हणजे हा प्रकार काय ? अहो गाढव पहिले . पण त्या गाढवालासुद्धा लाज वाटेल . गाढव कशाला म्हणायचं . गाढव पुष्कळ चांगला जनावर आहे . कधी कधी मला वाटतं ख्रिस्तानी गाढवावरती वाहन केलं होतं, ते गाढव सगळे हे होते कि काय ? हे असले घाणेरडे प्रकार . म्हणजे हे जे इथे  आहेत  ते कठीण नाहीत जेवढे आम्ही तिकडे बघतो. ऐंशी वर्षाचे म्हातारे, त्यांना काही समज नाही! मोठेपण नाही ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो म्हणजे काय हे? प्रगल्भता नाही! कसले अॅडव्हान्समेंट! 

यातले काही प्रश्न मी आपल्याला सांगितले तसं सायन्सचे प्रश्न आहेत कारण आपल्याकडे लोकांना वाटायला लागलं की, ‘आम्ही सायंटिफिक झालो’ वगैरे. जे लोक फार सायंटिफिक झालेत ते सुद्धा आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्यापैकी एक दोघांशी आपण हितगुज करावे, त्यांनी बोलावे आपल्याशी, अशी माझी इच्छा आहे. आपण त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला म्हणजे, आपले काही प्रश्न असतील तर मला विचारा म्हणजे मी उत्तरे देते . मग त्यांच्याशी बोला . म्हणजे अश्या प्रकारे तुम्हालासुद्धा कल्पना येईल, की ज्याला आपण सायन्स म्हणतो ते कुठे गेलेले आहे. बरं आता प्रश्न विचारा मला . काहीही विचारा प्रश्न . तुम्हाला सहजयोगात येणारे अडथळे असे प्रश्न विचारा. सहजयोग्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे मला समजेल, तुम्हाला काय त्रास आहे ? काय अडथळे आहेत? किंवा कसं समजावून सांगायचे असा काही प्रश्न असेल तर विचारा. कुंडलिनीबद्दल किंवा कशाही बद्दल . आता यांनी विचारले ‘जालंधर योग वगैरे ते ऐकून घ्या. आता ह्याच्यात घोटाळा झालेला आहे , की तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. जालंधर बंध होतो म्हणजे जालंधर हा जो चक्रातला एक भाग आहे म्हणजे अढी आहे ती. ती अढी पूर्णपणे उघडते आणि ती उघडून अशी घट्ट धरते कुंडलिनीला, असा त्याचा अर्थ आहे. नाभी चक्रावरची गोष्ट आहे ही. कुंडलिनी जेव्हा वर सरकू लागली समजा, कोणतीही गोष्ट वर सरकू लागली म्हणजे कठीण काम आहे नाही का ! खाली जाणं सोपं आहे, वर जाणं कठीण आहे. तर तिला वरती नेऊन धडक देणारी चक्रांची जी काही कसक आहे, जी काही गाठ पडते, चक्र स्वत:ला आवळून घेते. म्हणजे वर गेलेली कुंडलिनी खाली घसरू नये याच्यासाठी जालंधर योग वगैरे आहे.

 खेचरीसुद्धा तोच प्रकार आहे. विशुद्धी चक्रावरती जेव्हा कुंडलिनी येऊन वर सरकते तेव्हा विशुद्धी चक्र स्वत: तिला धरून सस्टेन करत असतं (त्याच स्थितीत ठेवते) की खाली पड़ू नये म्हणून. ठीक आहे ती क्रिया खरी तेव्हा जिव्हा आतल्या बाजूला ओढली जाणार नक्की. तसंच एकंदर सर्व चित्त आतमध्ये गेल्यामुळे तिथे बंध पडतो. आता हे तुमच्या लक्षात येत नाही. हे तुम्हाला समजत नाही कारण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आतमध्ये काय घटना घटित झाल्या ते लक्षात येत नाही. फक्त लक्ष कुंडलिनीकडे धावतं कारण तुमचं लक्षं बाहेरून आतमध्ये ओढलं जातं. ही घटना आतमध्ये सूक्ष्म होते. लक्ष सुद्धा सूक्ष्मात उतरतं. तर त्यावेळेला हे होत असतं आपल्यामध्ये घडामोडी, आता ही इथून वीज निघाली समजा तर ती आतमध्ये येऊन कशी फिरते आणि इथे येऊन ती कशी लाऊडस्पीकर होऊन जाते, तशातला हा प्रकार आहे. म्हणजे ही सगळी आतमधली सूक्ष्म घटना आहे. ही आपल्या आतमध्ये सगळी घटित होते. हे जे लिहिलेलं आहे त्याला अर्थ आहे. हे श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. पण त्याचा अर्थ जो लावतात लोक, म्हणजे आपण असं बसलं म्हणजे जालंधर बंध पडला हे चुकीचं आहे, तुम्ही करू शकत नाही, हे घटित होतं. आता बघा केवढा फरक आहे. ते नॅचरल (स्वाभाविक), आतमध्ये घटित होतं. आता मी असा हात धरला म्हणजे का मायक्रोफोन होणार आहे ? तुम्ही जर म्हणाला, ‘आम्ही गव्हर्नर झालो’ म्हणजे काय तुम्ही गव्हर्नर होणार आहात ? त्याने शक्य झालं का? तुम्हाला कोणी मानेल का? फार तर पागलखान्यात घालतील. एखाद्या माणसाने ओरडावं, ‘मी गव्हर्नर आहे’, वाटेल तर एक मोटार न्यावी तशी ओरडत. लोक म्हणतील, ‘या सगळ्यांना घाला पागलखान्यात.’ जे अधिकार या वस्तुंमध्ये बांधलेले आहेत त्या सूक्ष्म वस्तू आहेत आणि ते अधिकार सूक्ष्म आहेत आणि ते करतात स्वत:. ते तुम्हाला करून जमत नाही. म्हणून याला सहजयोग म्हणतात. सहजयोग हा अत्युत्तम आहे. सर्वात वरचा आहे म्हणून तो महायोग आहे. सहजयोग म्हणजे सगळे काही. बाकी असहज काहीच होत नाही. तुम्ही काही करता ही कल्पना जर डोक्यातून काढली तर गोष्टींना अर्थ लागतो. फक्त तुम्ही स्विच लावून देता. बाकी सगळं होतं. ते इलेक्ट्रिसिटीमध्येच बांधलेलं आहे की ती अशी वाहिली पाहिजे, तिचं कनेक्शन लागले म्हणजे तिच्यातून लाईट निघालाच पाहिजे, अशा वर्तुळातून गेली म्हणजे तिचा माईक झालाच पाहिजे, तशा वर्तुळातून गेली म्हणजे त्याचा पंखा झालाच पाहिजे. हे इलेक्ट्रिसिटीचंच तत्त्व आहे. तसंच ते कुंडलिनीचं आणि तुमच्यामध्ये बसलेली सुषुम्ना नाडी वगैरे जे काही सबंध   यंत्र तुमच्यामध्ये आहे, त्याचं स्वतःचं सगळं बांधलेलं तत्त्व आहे आणि ते तत्त्व असं असं घटित होतं, असं श्री ज्ञानेश्वरांनी सांगितल्यावर ते आम्ही करू शकतो. तुम्ही जर म्हटलं, ‘आम्ही इथे बोट लावून दिवा लावतो, तर दिवे लागायचेच. लावून बघावं आणि ते दिवे लागले म्हणजे कुंडलिनीचा असा त्रास होतो, तसा त्रास होतो असं पुस्तकात लिहून ठेवायचं म्हणजे लोकांना वाटतं वा किती छान आहे ! यांना एवढा त्रास झाला तर आम्हाला किती झाला पाहिजे.

 आता एक गृहस्थ त्यांनी लिहिलंय की, ‘माझी कुंडलिनी जागृत झाली आहे. ‘ म्हणजे स्वत:चं सेल्फ सर्टिफिकेशन आणि त्याच्यामुळे माझ्या हातावर अगदी विंचू चावल्यासारखं झालं. मी फार तडफडलो. माझ्या अंगावर फोड निघाले. आतून एकदम गरमी झाली, माझे डोकं भणभणायला लागलं, माझी स्थिती खराब झाली, मग मी लोकांना विचारले. त्यांनी सांगितले, ‘तुमची कुंडलिनी जागृत झाली.’ एखाद्या गुरूंकडे गेले असतील. तिथे काही तरी प्रकार केले असतील आणि अनाधिकार चेष्टा केल्यामुळे हे श्रीगणेशांचे तडाखे आहेत. ते सिंपथेटिकवर फील झाले. तर लोकांना ते पुस्तक फार आवडते. म्हणजे मनुष्य स्वत:च्या मागेसुद्धा हात धुवून लागलेला आहे. अहो, इतका तुम्हाला जर त्रास झाला आहे, तर त्याला कशाला घालता तुम्ही? काल मी सांगितलं होतं, की कुंडलिनी तुमची आई आहे आणि आई किती प्रेमाने आपल्या मुलांचे संगोपन करते! ती तुम्हाला असा कसा त्रास देईल, असा साधा विचार करा. हे असले लिखाण वाचून आलेला मनुष्य नक्कीच आम्हाला काही जागृती झाली नाही असा विचार करून बसणार. कारण त्याच्यात तो बेडकासारखं उडाला पाहिजे किंवा विंचवाने तरी चावलं पाहिजे, नाही तर त्याला ढेकणासारखा वास आला पाहिजे, काही काही असे प्रकार असतात, पण एक गोष्ट खरी; जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा इतरसुद्धा अनुभव येतात, पण ते अनुभव विशेष मानू नये. कारण उजव्या बाजूला जरा जास्त कुंडलिनी ढकलली गेली तर प्रकाश दिसेल तुम्हाला. त्याचं विशेष मानायचं नाही. तुम्ही बरोबर मधोमध असाल तर काही दिसणार नाही. नंतर सुगंध येतो. कारण पृथ्वी ही आई आहे. तिची तन्मात्रा सुगंध आहे. पृथ्वी ही सुगंधापासून बनविलेली आहे आणि ती आई असल्यामुळे, तुम्हाला कधीही आमची आठवण आली तरी सुगंध येणार. सुगंध हा आमच्या शरीराचा स्वभाव आहे. अनेक तऱ्हेचे सुगंध येत असतात लोकांना. कोणी म्हणतात, ‘श्रीमाताजी आम्हाला-आता कालच आम्ही गेलो तर गुग्गुळाचा इतका सुगंध खोलीत पसरला.’ खरं ते हे गृहस्थ भगवानजी बनून फिरत आहेत, त्यांना कसलाच सुगंध चालत नाही. ईश्वर सुगंध प्रिय आहे. म्हणजे हे कसले भगवानजी आहेत ! हे दुर्गंध प्रिय आहेत, घाणप्रिय आहेत ! हे परमेश्वर कसे ? तर सुगंध जर आला माणसाला, तर त्याच्यात हे आहे, की सुगंधाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याने जरासा बहकतो मनुष्य. प्रकाशही दिसेल, सगळं काही आहे. पण याचं पुढे तुम्हाला कळेल, की प्रकाश जेव्हा माणसाला दिसू लागतो ते आज्ञा चक्रही उघडलं गेलंय यात शंका नाही. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला असे काळे काळे ठिपकेसुद्धा दिसतील. त्या बाधा आहेत. त्या तुमच्यात असतील, दुसर्यात असतील, वातावरणात असतील. त्या कशा काढून टाकायच्या वगैरे वगैरे. प्रकाशाचे जे अवलोकन आहे, ते पूर्णपणे आधी कुंडलिनी स्थिर करून घ्या. माझे काय म्हणणे आहे, आधी दिल्लीला पूर्णपणे पोहोचा, पोहोचल्यावर दिल्ली काय आहे ती जाणली पाहिजे. तेव्हा ते पुढे मग समजतं, हे प्रकाशाचे प्रकार, या ज्योतीने काय होतं , सगळं काही बारीक बारीक, जिथपर्यंत व्हायब्रेशन्स दिसू लागतात. त्याचं वर्तुळ दिसू लागतं. त्याचं फिरणं दिसू लागतं. हे नंतर दिसलं पाहिजे. सुरुवातीलाच असं थोडसं दिसलं, तिकडे मनुष्य रमला, की गेलं ! म्हणजे घोडा असतो तसं हे मन आहे. त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. जर त्या घोड्याला कळलं, की तुम्हाला रस्त्यात गवत खायचंय, तर ते नेतं गवताकडे. पण त्याला कळलं, की तुम्हाला लक्षावर जायचंय तर तुमच्या अगदी बरोबर कह्यात राहणार. अगदी बरोबर. पण त्याला कळलं पाहिजे की हा मनुष्य घोडेस्वार आहे. त्याला माहिती आहे. पण जर घोड्याला कळलं, की तुम्हाला घोड्यावर बसता येत नाही, तर मग लागतो तो तुम्हाला त्रास द्यायला. त्या घोड्यावर बसता आलंच पाहिजे म्हणजे तो तुमचा मित्र होणार. तुमचा वाहक होणार. तेव्हा या चित्तालासुद्धा एक घोडा समजून सारखं निक्षून सांगायचं, की मला तिथेच पोहोचव तू, दुसरं इकडे तिकडे नेलेलं मला चालायचं नाही. म्हणजे बरोबर तो परम पदाला घेऊन जातो.