Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976.

सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे.

आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास घेऊन आणि काय काय कल्पना केल्या, त्यांना सहजयोगामध्ये माताजी आता बोटाच्या सहार्यावरती तिथे पोहोचवतात कशा आणि करतात कशा? यावरती जर आश्चर्य झालं तर त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही समाधीमध्ये तीन प्रकारच्या समाधी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पैकी पहिल्यांदा ते म्हणतात, ही सगळी मंडळी हं, मी नाही म्हणत, हे लोक म्हणतात, की आधी सालोक्य समाधी होते. सालोक्य समाधीमध्ये माणसाला दिसतं. आता दिसणार कसं? दिसतं, म्हणजे साक्षात् तुम्हाला गणेश दिसतो. नंतर तुम्हाला पुढे गेलं की कुंडलिनी दिसते. त्याच्यापुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला विष्णू-लक्ष्मीचं दर्शन होतं. ही गोष्ट खरी आहे. सालोक्य समाधी जेव्हा माणसाला मिळते , तेव्हा त्याला असं दिसतं.
परवा मी तुम्हाला असं सांगितलं आहे, की दोन शिड्यांवरती पाय देऊन एक मनुष्य धडपडत धडपडत चालला होता. शिड्या नाहीत. शिड्यांपेक्षा म्हणा, भिंती आणि त्या भिंतीवर एक पाय इकडे दिला आणि एक पाय तिकडे दिला.. आणि मधोमध जे काही आहे ते त्याला दिसतंय. पण त्याच्यामध्ये तो नाही. जी वस्तू तुम्हाला ন

दिसते त्याच्यामध्ये तुम्ही नसता. बाहेरून दिसणाऱ्या ही बिल्डींग दिसेल. पण इथे (आत) असेल तर तुम्हाला बिल्डींग दिसणार आहे का? मग शेवटी धडपडत धडपडत तुम्ही असे वर चढत गेलात तर एका स्थितीला पोहोचल्यावर, एका दशेत पोहोचल्यावर तुम्ही अगदी थकून तिथे गळून पडता. आणि तिथे जाऊन पडल्यावर तुम्ही त्या सर्व लोकांच्याजवळ आल्यासारखं तुम्हाला वाटतं. त्याठिकाणी सामीप्य अशी समाधी घडते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कृष्ण इथे उभा आहे, आपल्या शेजारी. कधी वाटतं, इकडे राधा आली आहे. कधी दिसतं तुम्हाला, साक्षात्, साईबाबा बसलेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही तिथे नाहीत, जिथे ते आहेत. सामीप्य स्थितीतसुद्धा तुम्ही तिथे नाही जिथे ती मंडळी आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या विचारात असता की, ‘बुवा, ते आले आमच्याकडे आणि त्यांनी आमचं हे कार्य केलं. आमच्या गोवऱ्या थापून दिल्या विठ्ठलाने.’ खरी गोष्ट आहे, खोटं नाही. पण तुम्ही विठ्ठलाच्या हृदयात नाही गेलेले. त्याच्यातलं सौंदर्य तुम्ही पाहिलेले नाही. गोवऱ्या थापून दिल्या तर काय झालं? काय विशेष घडलं? पण त्यावेळेला ती स्थिती होती की गोवर्या थापायच्या होत्या, म्हणून त्यांनी. त्या थापल्या, असं समजायचं. त्यावेळेला ही स्थिती नव्हती की हृदयामध्ये स्थान द्यायचं. तुम्हाला दर्शन घडले, कबूल. दर्शन हे घडायला पाहिजे. जर त्यावेळेला दर्शन घडले नसते तर लोकांचा परमेश्वरावर विश्वास नसता बसला. म्हणून दर्शनं दाखवली. पण काळ बदलतो नां! आज तो समय नाहीये. वेळ बदललेली आहे. आणि ह्या वेळेला काय झालं पाहिजे? तर मनुष्याला तादात्म्य मिळालं पाहिजे. जर त्याला तादात्म्य नाही मिळालं तर परमेश्वरावरचा त्याचा सबंध विश्वास ढासळून पडतो .आणि परमेश्वर म्हणून कोणी वस्तू आहे त्याचा विश्वास बसला पाहिजे. म्हणून त्यांची दर्शनं होतात. हे कबूल!

तर एक ते सालोक्य समाधी आणि सामिप्य समाधीमध्ये एक विशेषतऱ्हेची माणसाला जाणीव येते. पण त्याच्यामध्ये त्याला गती होत नाही. जो जिथे आहे तिथूनच गप्प आहे. पहिल्यांदा दिसत नव्हतं, आता दिसतंय. पहिल्यांदा वाटत नव्हतं, आता वाटतंय कि जवळ आहे बुवा . पण त्याची आतमधून गती होत नाही, प्रोग्रेस होत नाही, इवोल्यूशन होत नाही. म्हणजे उत्क्रांती होत नाही त्याची. तेव्हा असा प्रश्न येतो, की उत्क्रांती कशी होणार ? ती तादात्म्याने होणार.. ती तिसरी स्थिती आहे. त्याच्यामध्ये तादात्म्य झालं पाहिजे.

आता तादात्म्य म्हणजे काय? तादात्म्य म्हणजे असं, की ह्या सर्व शक्तींना वाट देणारे हे जे मोठेमोठे अवतार आहेत, ते साक्षात् परमेश्वराचे अंशच म्हटले पाहिजेत किंवा अंशापेक्षा मी त्यांना परमेश्वराचे पैलू म्हणते, अॅस्पेक्ट आहेत. तर हे जे तुम्हाला विष्णू स्वरूप किंवा गणेश स्वरूप किंवा ख्रिस्त स्वरूप, हे जे काही दिसताहेत ते त्या परमेश्वराच्या शक्तीला चालना देणारे, त्या शक्तीला आऊटलेट देणारे आहेत. पण त्या शक्तीतच तुम्हाला सामावून टाकलं, तर तादात्म्य स्वरूपत्व आलं. ती शक्ती जर तुम्ही झालात, तर तुम्हाला तादात्म्य आलं. आता है जितके काही देव-देवता वरगैरे आहेत, हे त्या निर्विकार, निराकार शक्तीचे चालन स्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये ती सर्वव्यापी शक्ती, सामावलेली आहे. ज्याला आपण म्हणू इनफायनाइट इन टू फायनाइट. म्हणजे अमर्यादित जे आहे ते मर्यादित झालेले आहे. अशी ही जी व्यक्ती आहे, तिलाच आपण अवतार म्हणतो. पण त्यांच्यातही जी अमर्याद शक्ती आहे, तेव्हा त्या शक्तीतच तुम्हाला बुडवून टाकायचं. त्या शक्तीतच तुम्हाला तद्रूप करायचं, त्याच्या सागरात तुम्हाला एकाकार करायचं म्हणजेच सहजयोग आहे.

आता त्याला पद्धती अनेक आहेत, लोकांनी काढलेल्या. काळवेळाप्रमाणे त्यांना जमल्या. ज्यांना जमल्या त्यांना जमल्या, नाही तर नाही जमल्या. पैकी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ही पद्धत काढली होती, की हे जे देव-देवता आहेत त्यांचं वर्णन करायचं आणि त्यांना खुश करून द्यायचं. मंत्र जागरण करायचं, मंत्राने त्यांना जागृत करायचं. त्यांना खुश करायचं. त्यांची स्तुती करायची. देवतांना स्तुती प्रिय असते, असं एक लोकांना वाटतं. माणसाच्या जे बुद्धीला आलं त्याने ते केलं. तर स्तुती सुरू केली, त्यावेळेला अज्ञानी असल्यामुळे मनुष्याची बुद्धी एवढी वाढली नव्हती म्हणून म्हणा, किंवा मनुष्याला एवढं समजत नव्हतं म्हणून म्हणा, परमेश्वराने त्याचं एवढं काही वाईट वाटून घेतलं नाही, की तुम्ही अनधिकार चेष्टेमध्ये त्याची आठवण काढता. आणि अनेक अवतार संसारात आल्यावर त्या लोकांनी काही काही लोकांना पार केलं. फार थोडे लोक. आणि हीच मंडळी पुढे जाऊन त्यांनी इतर लोकांना पार करायला सुरुवात केली.

आपण असे म्हणू की परशुरामापासून ही गोष्ट सुरू झाली. परशुरामाचा जेव्हा अवतार झाला, त्यावेळेला व्यक्तिगत अध्यात्माला सुरुवात झाली. लोक एकएकटे जाऊन जंगलात बसून अध्यात्म शिकू लागले. पण परशुराम अवतरण होतं. परशुरामाबरोबर दत्तात्रेयांनीसुद्धा अवतार घेतले होते अनेक. त्यामुळे परशुरामाच्या अवतारामध्ये दत्तात्रेयांचासुद्धा सहयोग झाल्यामुळे कुठेतरी करोडो, लाखोमध्ये, एखाद्याला हे घटत असतं. आणि ते झालं म्हणजे तोही आपला जंगलात बसायचा. त्याच्यापुढचाच तो. फक्त त्याच्याजवळ गेले तर मंडळी ठीक व्हायची, काही झालं तर, ‘तो आहे संत मनुष्य! त्याला नमस्कार केला पाहिजे,’ वगैरे वरगैरे. त्यांनी एक- दोन कार्य मोठी अशी केली, की ज्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत अशा दगडांना देवत्व आणलं. तिथे देवळं उभी केली. आता आपल्याकडे जसं आपण म्हणतो, की गणपती आहेत. अष्टविनायक आहेत. ते खरे आहेत. पण त्यांना ओळखून काढायला हीच मंडळी जी थोडीशी, दोन-चार होती जी पार झालेली मंडळी होती, त्यांनी सांगितलं की हे आहेत. त्यांनी पूजनाला सुरुवात केली, तिकडे देऊळ उभारणं झालं. बरं काही काही मोठे मोठे गुरू झाले. त्यांना म्हणता येईल. काही लोक झाले मोठे मग त्यांनी असा विचार केला, की सर्वसाधारण माणसाला काही दिलं पाहिजे. आता ते बोलायचे तिथली गोष्ट. आपण आहोत इकडे.

त्यांचे शिष्य झाले, मग त्यांचे शिष्य झाले, तीन-चार. ह्याच्यामध्ये जे खरं होतं ते गेलं चुलीत आणि जे नव्हतं ते सुरू झालं. खरं हे होतं, की तुम्ही परमेश्वराला अनन्य भक्तीने पूर्णपणे शरणागत होऊन त्याची आठवण केली पाहिजे. त्याला पूर्णपणे हे मागितलं पाहिजे की, ‘मला तुझा आशीर्वाद म्हणजे तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद म्हणजे तुझ्यामध्ये तद्रूप होऊ दे. तुझ्याशी मला एकरूप होऊ दे.’ हेच एक मागणं होतं. हे नाही की माझ्या मुलाला नोकरी लाव. पण मनुष्य हळूहळू अत्यंत जडवादी होऊ लागला. आणि जसाजसा तो जडवादी होऊ लागला तसातसा त्याने परमेश्वराचा दोन वस्तूंशी संबंध लावला. कसा लावला, कुठे लावला? त्यातलं एक तर मला माहिती आहे. पण दुसरा तर मला माहिती नाही. तो कुठे, कधी लावला? पहिल्यांदा त्याने सेक्सशी संबंध लावला देवाचा. आता देवाचा संबंध सेक्सशी काहीही नाही. अगदी नाहीये. पण ह्याने लावला, ह्याला कारण असं, की काही लोकांनी गणपतीलाच कुंडलिनी म्हणून निर्णय दिला. कारण नुसती सोंड दिसली गणपतीची आणि त्याला म्हटलं की हे कुंडलिनीचं स्वरूप आहे. कारण ते सेक्सवर असतं. म्हणून त्याचा संबंध सेक्सशी लावून ठेवला. पुष्कळ लोक म्हणतात, स्कंदामध्ये कुंडलिनी असते. म्हणजे नाहीच आहे तिथे. तुम्ही डोळ्यांनी बघा नां! मी दाखवते तुम्हाला इथे. स्कंदाशी काहीही संबंध नाहीये. इथे हे श्रीगणेशाला बसवलेले आहे. पण हा जो सुरुवातीला घोटाळा झाला, त्याच्यामुळे सेक्सशी संबंध परमेश्वराचा लावून टाकला. बाप रे बाप! म्हणजे केवढी मोठी घोडचूक. याला घोडचूक म्हणावं की हत्तीचूक म्हणावी हे समजत नाही. परत चूक त्यांनी आपली भोळेपणात केली असेल. पण त्याचा परिणाम बघा काय झाला ? आता त्याच्या परिणामाला जोडायला एक आर्टिकल लिहिणार आहे मी एवढं मोठं%; पण थोडक्यात सांगायचं म्हणजे सेक्सशी संबंध म्हणजे हे सगळे तांत्रिक आले, मांत्रिक आले. त्याच्यानंतर मग ते काही काही असे लोक की आजच मी एक नवीनच ऐकलं की नवीन सून घरात आली की पहिले महाराजांच्याकडे हवेलीला जायचं तिने. काय म्हणावं या लोकांना. परमेश्वराच्या नावावर हे असले व्यभिचारी धंदे आहेत. व्यभिचाराचा आणि परमेश्वराचा संबंध लावणं म्हणजे हे माणसाच्याच डोक्यात येऊ शकतं. जनावराच्यासुद्धा नाही येणार हं! म्हणजे कसं माणसाचं डोकं हे उलटं बसवलेले आहे की काय आहे ! बसवलं देवाने ठीकच होतं. पण तुम्ही कसं उलटं चालवता ते बघा. व्यभिचाराचा आणि परमेश्वराचा संबंध लावून ठेवलेला आहे. इथपर्यंत त्याची कमाल केली, की अश्वमेध यज्ञासारख्या यज्ञालासुद्धा त्यांनी सांगितलं, तो सुद्धा सेक्सचरच एक्स्प्रेशन आहे. शिव-पार्वतीसुद्धा सेक्सचर्च एक्स्प्रेशन, म्हणजे डोळा, म्हणजे म्हणतात नां की, सावन के अंधे को भी सभी हरा दिखायी देता है। म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आंधळे झालात तर त्याला सगळच हिरवं दिसतं. तशातलं आहे. म्हणजे सगळं माइंड जे आहे, म्हणजे सगळे डोक्यातले विचार एकाच ह्याच्या भोवती फिरतात. झालं, मग सगळं झालं आता. शिव-पार्वती झाले. म्हणजे सगळ्यांना आणून तुम्ही आता सेक्सच्या ह्याच्यावरती आणून सोडून दिलं आणि अजूनही राजरोसपणे त्याच्याबद्दल लोक बोलताहेत. त्यांना काही लाजा नाही वाटत त्याच्यावरती.

अजून पेपरमध्ये छापतात. मूलाधारावरती कुंडलिनी आहे हे त्यांना माहिती आहे. मूलाधार चक्रात ती बसलेली आहे. आता काय सांगायचं तुमच्या आईला तुम्ही सेक्सवर बसवता. काही शहाणपण, तुम्हाला आईपण आहे की नाही. मुर्खासारखे . हा एक महामूर्खपणा केला. आणि दुसरा त्याचा परिणाम म्हणजे, ते मला माहीत नाही कुठून आलं. पण एक पैशाशी देवाचा संबंध लावणं. कमाल आहे बुवा माणसाची! अगदी खरी कमाल आहे. अहो, पैसे काय देवाने बनवले आहे का? तुम्ही बनवले आहेत. पूर्वी पैसे म्हणून काही वस्तू होती का जगामध्ये. त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लावता तुम्ही? अगदी डोकं आहे माणसाचं, विशेष. म्हणजे बिझनेसच करायचा मुळी. कोणीही आला मनुष्य त्याला हवेल्या पाहिजेत. त्याला मोटारी पाहिजेत. इथपर्यंत असे धर्म जगामध्ये आहेत, की तुमच्या गुरूला तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. आणि ते कोणते सुख तर त्याला तुम्ही जर बायका दिल्या, त्याने मग इंग्लिश बायकांशी लग्न करायचे, नाहीतर फ्रेंच बायकांशी लग्न करायचं. आणि तुम्हाला पुढच्या जन्मात ते मिळेल. मग त्या गुरूंना तुम्ही हि्यामध्ये तोलायचं. मोत्यांमध्ये तोलायचं. त्यांना मग आता पितळ्यातही तोलायला मिळेल कि नाही माहिती नाही. पण असले प्रकार. आणि राजरोसपणे सगळीकडे चालू आहे. त्याच्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शनच नाही. म्हणजे काही तरी त्याला ताळतंत्र पाहिजे. बरं आम्ही काही असं म्हटल्याबरोबर ‘तुम्ही आमच्या गुरूला का म्हणता?
कारण हे गुरू आहेत का काय? पायातल्या खेटरांनीसुद्धा मारण्याची मला इच्छा होणार नाही, असे घाणेरडे हे लोक आहेत. त्यांना गुरु म्हणून मिरवता तुम्ही आणि मी जर म्हटलं की या गुरूंना उचलून समुद्रात फेका, तर माझ्यावर बिघडता. सगळ्या तुमच्या कुंडलिन्या मोडून आणि जन्मभरासाठी तुम्हाला यांनी नरकात टाकून ठेवलेले आहे. पण त्यांचाच उदो, उदो चाललेला आहे. आणखीन करा उदो. हे पैसेखाऊ, आणि हे बायकांच्या ह्याच्यावर येणारे आणि दारू ठोसून प्यायची तिथे.

साक्षात् एक गुरू महाराज आले होते म्हणे. ती बाई त्यांचे पाय चेपत होती आणि तिकडे ते दारू पीत होते. त्या बाईला अक्कल नाही. फार मोठी बाई आहे. सुशिक्षित. तिला एवढी अक्कल नाही, की इकडे हा बसून दारू पितो आहे आणि मी त्याचे पाय चेपते आहे. आणि त्याला शरणागती म्हणजे नरकच मिळणार की नाही तुम्हाला. अहो, काही डोकं आहे की काय? माणसाला काही विचार येत नाही म्हणजे काय ? इतके मुर्ख कसे ? ही, ही एक बाजू झाली . मग दुसरं करा. आता मग हेच देवळात सुरू झालं. देवळात श्रीगणेशाची मुर्ती ठेवायची आणि घाणेरडेपणा करायचा त्याच्यासमोर. तो म्हणजे, चिरकालातला बालक म्हणतात त्याला. त्याच्यासमोर मजाल आहे तुमची की तुम्ही काही घाणेरडे एक अक्षर बोलाल. आणि त्याच्यासमोर घाणेरडेपणा केल्याबरोबर तो जो सडकतो, मग म्हणायचं की नाही, आम्ही आपले हाल करून घेऊ. आम्ही आपलं सॅक्रिफाइस करतोय. कितीही सडकला तरी आम्ही घाणेरडेपणा करू. मग तो तिथून गेला, त्या देवळातून एकदा ते उठले की मग चालले अनाचार. म्हणे आम्ही तांत्रिक! ह्यांच्यासाठी शब्द नाहीयेत जगामध्ये. पण मनुष्य इतका मूर्ख आहे, की त्याला हे सगळं आवडतं. मनोरंजन त्याचं ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टींनी होणार.

आणि पैशाच्या बाबतीत तसेच झालेले आहे. देवळात गेले. द्या बुवा सव्वा रुपये. भाडोत्री लोक ठेवलेले आहेत तिथे पूजनाला एवढे मोठे पोट सुटलेले. ही मंडळी आली आणि त्यांनी पैसे घेतले की झालं त्यांचा सगळा धर्म, ‘वा, वा, आम्ही नां इतके लक्ष रुपये चढवले.’ बरं, हे ही झालं . मग हवन आदी, पूजन आदि गोष्टीसुद्धा. ह्याला काही अर्थ नाहीये. कारण तुम्हाला अधिकार नाही. हवन, पूजन इतकेच काय पण त्यांचा नाव सुद्धा घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग हवन, पूजन कसलं काढलंय. हवन, पूजन तुम्ही जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये हाच गोंधळ! म्हणून आपल्या त्या देशामध्ये पुष्कळ अशा क्रांत्या झाल्या.. त्याला ते धार्मिक म्हणतात, मी म्हणेन त्या बौद्धिक क्रांत्या आहेत. त्यांनी सांगितलंय हे सगळें तुम्ही सोडून टाकायचं. आणखीन निराकार परमेश्वरात रहायचं. म्हणून आर्य धर्म, अमका तमका काढला. बरं ते काढून तरी परत तोच मूर्खपणा !

नाव नुसतं बदलायचं. कोट बदलला म्हणून आतलं काही बदललं आहे का? नुसतं बाह्यातलं बदलून आतमध्ये तीच स्थिती. निराकाराच्या गोष्टी करून तुम्ही निराकारात उतरू शकत नाही. त्याच्यातही पैसे. पहिलं काम पैसे. organisational. अरे पण तुम्ही करत काय आहात ? एखाद्या तरी माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का ? म्हणजे तुम्ही स्मगलिंग करा. व्यवस्थित. आर्यसमाजी आहात ना ! स्मरगलिंग करायला काही हरकत नाही. आम्हाला हरकत नाही. फक्त काय ? फक्त तुम्ही देवळात नाही जायचं. मग आर्य समाजी तुम्ही पक्के. तुम्ही स्मगलर आहात ना ? काही हरकत नाही. तुम्ही गळा कापला भावाचा. काही हरकत नाही. आम्ही सपोर्ट करू. आम्ही तुमच्यासाठी केस लढवायला येतो. काही हरकत नाही. तुम्ही आपल्या सासूला मारता, ठीक आहे. काही हरकत नाही. काहीही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही एक करायचं , की देवळात जायचं नाही. कबूल, व्वा, उत्तम ! सगळ्या तऱ्हेचं लायसन्स मिळाल्यावरती मग आर्यसमाज करायला काय हरकत आहे हो ! इकडे तुम्ही धार्मिक होता, तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. क्लबमध्ये गेले आपले. आर्यसमाज क्लब झालं. स्मगलिंग केलं तरी काही हरकत नाही. घाणेरडेपणा केला तरी हरकत नाही. बायकांना इज्जत, अब्रू असली तर हरकत नाही. फक्त त्यांना मात्र चंदा द्यायचा, गुरूंना पैसे भरायचे. अशा रीतीने धर्माचं अत्यंत सुंदर रूप संसारात मांडून ठेवलेले आहे सगळ्यांनी . आणि हे बघून परमेश्वराला वाटत असेल, की बाप रे! ही माकडें मी कुठे तयार करून ठेवली? एवढी मेहनत करून ह्या माकडांना मी कुठे आणलेले आहे ? ह्यांना डोकं का नाही? धर्माच्या बाबतीत डोकं गहाण का ठेवलं आहे सगळ्यांनी? झालं, हे एक प्रकारचं झालं.

त्याच्यानंतर एक लाट आली, की सगळे जडवादी लोक सायन्स, सायन्स, सायन्स. देवालासुद्धा सायन्समध्ये आणायला बघतात. अहो, ज्यांनी सबंध सायन्स तयार केला त्याला कुठे तुम्ही ओढता इकडे! सायन्स काय किवा संसारातला एक एक कण काय, सारा त्याच्याच तर चरणात आहे ना! मग लोकांनी म्हणायचं, की आम्हाला दाखवा परमेश्वर आणून! तुम्हाला परमेश्वर आणून दाखवायला तुमची कमाई काय आहे ? तुम्ही कोण? तुम्ही सायन्सवाले नां! मग तुमच्यासाठी तयार आहे नां हे ऍटोमिक बॉम्ब वगैरे, हायड्रोजन बॉम्ब. उभे रहा त्यांच्यासमोर थरथरत. तुम्हाला देव कशाला पाहिजे दाखवायला आणि देवाला काय पडलं आहे तुमच्यासमोर येऊन उभा राहायला ! असे देवाला मानणारे असाल तर पहले त्याच्यासमोर आत्मसमर्पण करा. मोठे सायन्सवाले बनता! तर तुमच्यासमोर देव मुळीच येणार नाही. तो काय तुमच्या पूजेला बसलेला आहे? आणि जर तुम्ही त्याला मानलं अथवा नाही मानलं, तरी जे शाश्वत आहे, जे सनातन आहे, ते काही मिटणार आहे का ? तुम्हीच मिटणार. परमेश्वर मिटणार नाहीये. तुम्ही काय परमेश्वरावर उपकार करीत नाही, की आम्ही परमेश्वराला फार मानतो. म्हणजे आम्ही महामूर्ख आहोत. तुम्ही मानता म्हणजे, ते साक्षात् आहे. ते जगातले सगळे ग्रह- गोल, तो सूर्य आणि ती पृथ्वी आणि तुम्ही, आम्ही बनवलेत ते कोण? आणि त्याला मानणारे तुम्ही कोण लाटसाहेब ? काय मनुष्याचा अहंकार आहे नुसता! खरोखर. हिमालयापेक्षा मोठा अहंकार प्रत्येक माणसाच्या डोक्यात आहे. आता ही सगळी अशी, कलियुगामध्ये उगवलेली अशी उत्तम फळं आहेत. तेव्हा आता बघा तुम्ही. आता सहजयोग ! अशा स्थितीमध्ये मी तुम्हाला कुठे अध्यात्मात घातलं असतं, तर एक तरी टिकला असता का? असा विचार करणे. कारण त्याच्यात आधी डोक्यावर चिमटे मारतात म्हणे. आधी चिमटे मारून बघतात. मग लटकवतात उलटे. त्याच्यानंतर खालून धुऱ्या. त्याच्यावर टिकले तर पुढे अशी स्थिती.

तसं नको रे बाबा! मुलं माझीच आहेत नां! कशीही असली, वेडीवाकडी, तरी माझीच. कशीही वागली तरी अज्ञानी. तेव्हा प्रेमाच्या वर्षावाशिवाय काहीही इलाज नाही, असा विचार करूनच आम्ही आलो आहोत या संसारात आणि म्हणूनच असा विचार करून वर्षाव करतो आहोत तुमच्यावरती. आणि तुम्हाला तयार ही केलं आहे, की तुम्ही ते घ्यावं. त्या प्रेमाला आपल्यामध्ये स्थान देऊन स्वत:लाही सुंदर करून घ्यावं आणि दूसर्यांनाही ते प्रेम वाटावं. आणि हे प्रेमाचे मोती सगळीकडे उधळत फिरावे. आणि सगळ्यांना ह्याचा लाभ व्हावा. तुम्हाला जे अलभ्य मिळेल, त्याची किंमत तुम्हाला येणार नाही. त्या धडपडणाऱ्यांना जाऊन विचारा म्हणजे ते सांगतील तुम्हाला. अजून धडपडत आहेत, तंगड्या तोडत आहेत. त्यांना माहिती आहे ते किनाऱ्यावर बसले आहेत. पण तुम्ही फक्त तिकडेच जाता. परत चालले खाली. तेव्हा जरा नेटाने बसा. नुसतं तुम्हाला आम्ही कळसावर बसवलेले आहे. तिथेच सगळं एका बंडलात तुम्हाला दिले आहे. नुसतं बसून रहा तुम्ही. बसल्याबरोबर तुमच्या आतमध्ये जे चाललं आहे, ते देत रहा लोकांना. किंवा असं समजलं पाहिजे की पाजळलेला दिवा कुणी असा खाली ठेवत नाही. तो मंदिराच्या वर ठेवता. कारण तिथून लोकांना तो मार्गदर्शन करतो. जर आम्ही तुमचे दिवे पेटवले आहेत, तर ते मार्गदर्शनासाठी आहे. अंधाऱ्या रात्रीवर मात करण्यासाठी. रस्त्याने ही मंडळी धडपडत आहेत, त्यांचे मार्ग उजळण्यासाठी. ते असे वाया घालवण्यासाठी नाही. दुसर्यांची घरं जाळण्यासाठी नाहीत. पण सहजयोगाबद्दल फार मोठी सर्कस करायला नको. सगळ्यांचं म्हणणं आहे, की माताजी, तुमची पब्लिसिटी फार कमी आहे, वगैरे वगैरे. असू देत. हळूहळू ह्यांच्या पब्लिसिट्या कमी होतील.

कारण समोर येतंय सगळं साक्षात्. लोकांना दिसतंय सगळं काही आणि पटतंय. हळूहळू येतील, पण हे मार खाऊन आलेले लोक आहेत त्यांना तुम्ही नंतर ठीक करत बसा. आम्ही तर कंटाळलो आहोत, पहिल्यांदा सांगायचं म्हणजे. कारण इतका मूर्खपणा जगामध्ये आहे की कोणाला सांगितलं रे सांगितलं , की त्या माणसाकडे तुम्ही जाऊ नका, की तो मला मारायला धावतो. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे.

मुख्य म्हणजे प्रत्येकाने खुले आम लोकांना सांगायला पाहिजे, बेधडक! त्याच्याबद्दल काहीही भीती ठेवायला नको. माझं नाव वापरा. देवळात जाऊन, तिथे भेटतील, हे सगळं ढोंग आहे. कुठेही असा गुरू दिसला, की त्याला दोन जोडे मारून यायचे. त्याला सांगायचं तिथेच, की हे ढोंगीबाबा, तुम्ही निघा म्हणून. चार प्रश्न विचारायचे. आता भारतीय विद्या भवनमध्ये आज पण एक प्रोग्रॅम होतो आहे.फालतूचा जायला पाहिजे १५-२० मंडळींनी. विचारा, ‘काय चालवलं आहे तुम्ही? याने काय मिळणार आहे? ह्याने काही लाभ होतो का? तुमची एवढी चक्रं धरली आहेत, तुम्ही काय सांगता? सगळ्यांना पागलखान्यात पाठवाल.’ सगळ्यांनी असं बोलणं सुरु केल्याशिवाय ही चळवळ होणार नाही. घरी, आपल्या शेजारी, जे असतील त्यांना स्पष्ट सांगायचं की, नाही. आम्ही तुमचे नातलग आहोत. आम्ही तुम्हाला शेणात जाऊ देणार नाही. तुमचा सत्यनाश होऊ देणार नाही. प्रत्येक माणसाने असा निश्चय करायचा. सगळ्यांना सांगायचं. कारण तुम्हाला ह्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जाणकार आहात.अशाच रीतीने ठिणग्या पेटतात आणि उजेड पडतो. अशाच रीतीने कार्यसिद्धी होते. पण सगळे आपले, आम्हाला मिळालंय माताजी, कसं बोलायचं. ही सहजयोगाची पद्धत नाही. मीच एकटी ओरडत बसून चालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे. कुठेही दिसलं की सांगायचं की, ‘तू भामटा आहेस. पैसे खातो सगळ्यांचे.’ ही तुमच्यावर जबाबदारी आहे. ही सर्व सहजयोग्यांवर जबाबदारी आहे. कोणताही नातलग अशा घाणेरड्या, भोंद माणसाकडे जात असेल, तर त्याच्याकडे जेवायला जायचं नाही. वाळीत टाकायचं त्याला. जेवायला गेल्यावर तुमची नाभी धरणार. मी काही करणार नाहीये, पण नाभी तुमची धरणार. जा जेवायला त्याच्याकडे. ‘आम्ही कसं म्हणायचं माताजी? ते आमचे नातलग सख्खे चुलत सासूचे, सख्खे अमके.’ ते सख्यातले तीन आले की गेलात तुम्ही तिथे. तुमचे सख्खे हे आहेत, इथे बसलेले. हे तुमचे भाऊ आणि ह्या तुमच्या बहिणी. ह्यांच्या पलीकडचे लोक जर ह्याच्यात नाही आले, तर तुमचं कोणी नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही! हे परमेश्वराच्या साम्राज्यात बसलेल्या लोकांनी अशा हलक्या लोकांच्याकडे जेवायला जायचं नाही. आपलीसुद्धा एक असते. आपल्या अब्रूने रहायला पाहिजे. आणि परत हे डोकं कोणाच्याही पायावर ठेवायचं नाही. आणि जाऊन सांगायचं सहजयोगाबद्दल बेधडक. हे सगळे सांगत बसतात, खोटारडे कुठले. तुम्ही सांगू नाही शकत ! इतकी तोंडं असून बोलता येत नाही का तुम्हा लोकांना! सहजयोगामध्ये मनुष्य जरा नरम फार होऊन जातो. तसं नसलं पाहिजे. वाटलं तर तलवार ही घेता आली पाहिजे आणि वाटलं तर हातात कमळाची फुलंसुद्धा घेता आली पाहिजेत. सहजयोगाचं वैशिष्ट्य हेच आहे. जिथे पाहिजे तिथे तलवार ही घेता आली पाहिजे.

आणि तुम्ही माणसं त्याच्यातली पण आहात. कधी काळी तलवारी घेऊन लढलेले पण आहात आणि कमळं घेऊन पूजासुद्धा केलेली आहे. तेव्हा सहजयोगामध्ये आलेल्या लोकांनी आपली वीरश्री सोडायची नाही. जे चूक आहे ते चूक आहे. शंभरदा चूक आहे. ते करायचं नाही. स्वतःही नाही आणि दुसर्यालाही ते करू द्यायचं नाही. असं झाल्याशिवाय सहजयोग आपल्या फळाला उतरणार नाही. इतकं सत्य सहजयोगामध्ये आहे. ज्याला क्विक रिझ्ल्ट म्हणतात, तशातलं सगळं काही असून सुद्धा आपला सहजयोग फार हळू हळू फोफावतोय. त्याला कारण तुम्ही जोराने पसरवत नाही त्या गोष्टी. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी सहजयोगासाठी काय काय करू शकतो ? कसा पसरवू शकतो? माझ्या शेजारी दहा माणसं आहेत. चला बोलवा त्यांना जेवायला, चहाला. सहजयोगावरती भाषण सुरू. काही हरकत नाही. लोकांना कळलं पाहिजे, सहजयोग म्हणजे काय आहे ? साधीसुधी गोष्ट नाहीये. आणि सहजयोगी म्हणजे एक विशेष तऱ्हेचा नागरिक आहे. एक विशेष तऱहेचा जीव आहे. आणि तो म्हणजे गणपतीसारखा सर्वशक्तिमान आहे. गणपतीला सांगावं लागत नाही काही धुमधडाका ढेरपोट त्याचं नावच ठेवलेले आहे आम्ही. त्यांना म्हणावं लागतं, थांबा, थांबा, कुठे निघालात तुम्ही? तुम्हाला त्याच्याच सारखे (packet) बनवलेले आहे. अर्थात् ते साधू लोक मोठे मोठे त्यांना समजत नाही, की माताजी करतात तरी काय हे? सुरू काय केलं आहे? गणेश चतुर्थीच मांडली आहे मी सगळ्यांची. गणपतीसारखं व्हायला पाहिजे. त्यांना कोणाची भीती नाही जगात.
जे खरं आहे, त्या सत्यावर तो उभा आहे. जे खरं आहे त्याच्यासाठी कोणाला घाबरत नाही. सगळीकडे जे जे तुमच्या ओळखीचे आहेत, जे जे तुमच्या माहितीतील आहे त्यांची लिस्ट काढायची. पुढच्या वेळेस मी आले की दिसल पाहिजे. जास्तीची मंडळी ह्याच्यात यायला पाहिजे.

आता पुढच्या वेळी शनिवारी प्रोग्रॅम ठेवला आहे, भारतीय विद्या भवनला. लोकांना घेऊन या. प्रयत्न करा. दोन-चार दिवस इकडे तिकडे प्रयत्न करून, शनिवारी संध्याकाळी भारतीय विद्या भवनला प्रोग्रॅमला घेऊन या. त्याच्यानंतर कदाचित कोणताच प्रोग्रॅम होणार नाही. शेवटचाच प्रोग्रॅम आहे. माटूंग्याला सोमवारी आहे. तिथे आलात तर बरच आहे. सगळ्यांनी यायचं. पण भारतीय विद्या भवनला सहजयोग्यांसाठी आहे. तिथे मी दुसरंच बोलीन. कारण अजून तिथे कोणी पार झालेली मंडळी नाहीत. आता सहजयोगासाठी काय काय करायचं? नुसतं तुम्ही परमेश्वराला विचारल्याबरोबर तुम्हाला अनेक अनेक विचार तो देणार. काय करायचं? पुढे जायचं तर काय करायचं ? आणि काय मजा येते ती बघा. नाहीतरी संसारात काय मिळवायचं आहे? तीच भाजी-पोळी रोज खायची. आणि मरायचं परत . दोन पैसे शिल्लक मुलांसाठी सोडून जायचं. ह्याच्यापलीकडे ह्या जीवनाच्या चाकोरीत तुम्हाला काही मिळालं आहे का? पण सहजयोगाने मातीलासुद्धा सुगंध सुटेल अशी व्यक्ती तुम्ही झालेले आहात. जिथे तुमचे पाय पडतील तिथून सुगंध वाहणार आहे. तेवढी शक्तिशाली किमया तुमच्यामध्ये आहे. तिचा उपयोग करून घ्या. एक क्षणसुद्धा त्यामध्ये वाया दवडायचा नाही. कमाई, पैसे हे चालूच आहे. त्याबद्दल कितीही केलं तरी काय करणार? कमवून तरी काय मोठे दिवे लावलेत ? साधारणपणे संतोषाने संसारात राहिलं पाहिजे. जे मिळालं प्रभ.

पुष्कळ आहे. संतोषी मनाने राहून, संतोषात राहून, संतोष खरोखरच सहजयोगाचा मुकुट आहे. संतोषामध्ये राहून आणि अत्यंत पवित्र जीवन आपलं करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथम म्हणजे खोटं बोलणं, इकडून तिकडे लबाडी करणं, चोऱ्यामाऱ्या, त्याशिवाय दुसऱ्यांना दुखविणं , वाईटपणे बोलणं हे सगळं सोडलं पाहिजे .स्वतःकडे लक्ष असायला पाहिजे. स्वत:चं काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराकडे क्षमा मागितली पाहिजे. स्वत:मध्ये सौंदर्य असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी भुतासारखे वेष घेऊन फिरायला नको. मनुष्याला स्वच्छ रहायला पाहिजे. आपल्या घरामध्ये सगळीकडे सौंदर्यशाली असलं पाहिजे. दुसऱ्याशी बोलतांना सुद्धा एकत-हेचं सौंदर्य असलं पाहिजे. वागतांना किंवा काहीही कार्य करतांना मनुष्यामध्ये एकतऱ्हेचं सौंदर्य असायला पाहिजे. प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि काहीही द्राविडी प्राणायाम करण्याची गरज नाही. आरडाओरडा करण्याची गरज नाही. मध्यम मार्गावरती राहन साक्षीस्वरूपाने सगळं नाटक बघायचं. इतकं जर साधलं तर सहजयोग तुम्ही साधला. तुमचे जीवन एकदम बदलून जाईल. जी तुमची मूल्यं आहेत, तुमच्या ज्या प्रायॉरिटी आहेत, त्या एकदम बदलून तुमचा आराखडाच वेगळा होऊन जाईल. सगळे टेबलच बदलून जातं. असं झाल्याबरोबर ज्या गोष्टींचं मूल्य नाही त्या गोष्टी जरूर पडून जातात. आता एक लहानशी गोष्ट म्हणजे आमची तुमच्याकडे बरणी राहिली. तर ती बरणी तुम्ही आम्हाला पाठविली नाही. आता लहानशी गोष्ट बघा. आपलं महाराष्ट्रातलं कॉमन आहे बायकांचं. म्हणून सांगते. आता हे बघा, त्यांचा कसं हो ? मग चालले देवळात की ‘तुमची ती बरणी राहिली होती ना त्यांनी पाठवली नाही.’ ‘अहो, तुमची आम्ही पाठविली.’ मग त्यांनी तिसरीला सांगायचं. म्हणजे असल्या मूर्खपणाच्या गोष्टीमध्ये, सबंध वेळ घालवण्यापेक्षा, माझ्या मते अशा आयुष्याला इतिश्री केलेली बरी. थोडासा दिलदारपणा, थोडासा मोठेपणा येऊ देत! तो नसला तर सहजयोगाचा गौरव नाही. त्याची ग्लोरी दिसली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर. व्हायब्रेशन्सनेसुद्धा
तुम्ही पाहिलं तर फळांनासुद्धा ग्लोरी येते. मग माणसाला केवढी ग्लोरी यायला पाहिजे. असा एक मनुष्य जर चमचमीत जेवायला मिळालं किंवा नाही मिळालं, तुम्हाला चांगले कपडे मिळाले अथवा नाही मिळाले, संतोषात बसलेला असला तर त्याचा परिणाम इतरांवर होणारच. आणि दसरे लोक म्हणतील, हा एक मनुष्य आम्ही बघतो, किती संत आहे हो! पण जेव्हा अन्यायाची गोष्ट येईल तेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध एखादी खोटी गोष्ट घेऊन कोणी उभा राहिला तर त्या वेळेला तलवारी घेऊन निघालाच पाहिजे. तेव्हा घाबरण्याची काही गोष्ट नाही. पण नसत्या, फालतू गोष्टींसाठी आपले चित्त घालवायचे नाही. कारण हे चित्त परमेश्वराच्या चरणावर आम्ही वाहिलेले आहे.
आणि त्याच्या चरणाच्या अमृताने आमच्यावर वर्षाव केलेला आहे. आम्ही प्लावित आहोत. तेव्हा अशा फालतू गोष्टींसाठी आम्ही आमचे चित्त दवडणार नाही. तेव्हा स्वत:च्या आत्मसन्मानात, गौरवात उभे रहा. परत आपली भेट होईल शनिवारी आणि त्या पूजनाची व्यवस्था ही मंडळी करण्याच्या विचारात आहेत. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा. आणि मग थोडावेळ ध्यानात जाऊयात.