Shri Ganesha Puja and Devi Puja

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja

तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन केलेले आहे. तेव्हा ही भूमी अत्यंत पवित्र आहे. इतकी पवित्र की रामाला आणि सीतेलासुद्धा पायातल्या वहाणा काढून इथे यावे लागले. तेव्हा अशा या पवित्र भूमीवर तुम्ही बसलेले आहात. म्हणजे अत्यंत भाग्यवान आहात. आणि ते भाग्य विशेषच उजळायला आलंय आज. कारण एक तऱ्हेने थोडीशी सुबत्ता पण आलेली आहे. आणि त्या सुबत्तेमध्ये पोटापाण्याची एवढी विवंचना न राहिल्यामुळे परमेश्वरही लोकांना सुचू लागला आहे. म्हणजे हे सुद्धा नशीबच म्हटलं पाहिजे. कारण सुबत्ता आल्याबरोबर घाणेरड्याच गोष्टी लोकांना सुचतात. चांगल्या गोष्टी सुचणं म्हणजे कठीण काम आहे. म्हणजे अजून तरी देवाला धरून राहिलेले असे बरेच आहेत ह्या भूमीवर आणि म्हणूनच आपल्याला इतके सहजयोगी आजही एवढ्या सुबत्तेत दिसतात आणि ते इतकं मोठं कार्य करीत आहेत. पूजेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं, की तुम्हाला माहिती आहे, सहजयोगामध्ये आम्ही इंग्लंड वरगैरेला फार कमी लोकांना पूजेत येऊ देतो. आता बारा देशांचे लोक इथे आलेले आहेत. प्रत्येक देशातून पाच-सहा लोक फार तर असतील किंवा काही देशांतून १०- १५ असेही लोक आहेत. पण त्याच्यातले फार कमी लोक आम्ही पूजेला येऊ देतो. त्याचं कारण असं आहे, की परदेशात आता धर्म काय आहे ? ती भावना राहिलेली नाही.

त्यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत. आणि त्यातले असे घाणेरडे हल्ले झालेले आहेत, की त्या हल्ल्यांमुळे लोकांना धर्म काय किंवा चांगुलपणा काय किंवा पावित्र्य काय याची कल्पनाच राहिलेली नाही. आता हिंदुस्थानी मनुष्य कितीही बिघडला तरी त्यांना हे लक्षात राहतं की हा वाईटपणा आहे, हा चांगुलपणा आहे. पण तसं मात्र ह्या लोकांचं नाही. ते कितीही वाईट मार्गाला गेले तरी म्हणतात, ‘त्याच्यात काय चुकलं आमचं? ह्याच्यात काय चुकलं आमचं?’ म्हणजे धर्माचे एक प्रमाण आहे किंवा ज्याला आपण म्हणू खुंट आहे, ते खुंटच तुटलेले आहे. त्यात बेफाम, वाट्टेल तसं वागायचं. आणि ते वागल्यानंतर, म्हणजे नरकात पडल्यानंतर, अगदी नरकच उभा केला आहे सगळ्यांनी ! त्याच्यातून मग सहजयोगात येणं मग त्याच्यात पवित्र होणं आणि मग ह्या हवन कुंडातून निघणं म्हणजे फारच कमालीची गोष्ट ह्या लोकांनी केलेली आहे. त्याला कारण म्हणजे हे मोठे संत-साधू असले पाहिजेत. नाहीतर अशा मोठ्या नरकात जो मनुष्य राहिला तो होरपळूनच जाणार. पण त्याच्यातून निघून हे वर आलेले आहेत. पण तुमचं तसं नाही. तुम्ही अजूनसुद्धा पवित्र वातावरणात वाढलेले, बाळबोध घराण्यातले संभावित लोक आहात. त्याच्यामुळे तुमचं काही बिघडलेले नाही. थोडंबहुत इकडेतिकडे काही बिघडलं असेल, तर सहजयोगाला कठीण जात नाही. पण एकंदर आपण सुचारू रूपाने राहतो आणि आपल्यात फार बाळबोधपणा आहे. त्याचा आपल्याला लाभ होईल, पण ह्यांची जी चिकाटी आहे, ह्यांची जी मेहनत आहे आणि ज्या जोमाने हे सहजयोगात लागतात तसं मात्र इकडे दिसत नाही आपल्याला. कारण आपल्याला जे सोप्यात मिळतं त्याची आपल्याला कदर वाटत नाही. इथे म्हणजे पार व्हायला, तुम्हाला ते दिसेलच, की खेडेगावात सहा-सहा, सात- सात हजार माणसं पटापट पार होतात. पण तिथे एका माणसावर मला पाच-पाच महिने लागतात. हात मोड़तात माझे. तेव्हा इथल्या लोकांना सहजयोगात काय आम्हाला मिळालं हे समजत नाही. एकदा गगनगड महाराजांना भेटायला बरेचसे सहजयोगी गेले होते. तर गगनगड महाराजांनी त्यांना सांगितलं की, ‘मला एकंदर एकवीस हजार वर्ष लागली व्हायब्रेशन्स यायला. मी पहिल्यांदा बेडूक होतो. तेव्हापासून मला सगळ आठवतय. आणि बेडकापासून हळूहळू मी मानव झालो. तेव्हापासून मी परमेश्वराला म्हणत होतो, की परमेश्वरा, मला कसेतरी करून चैतन्य दे. करता- करता मानव झाल्यावरही मी फार तपश्चर्या केली. अनेक, हजारो वर्ष तपश्चर्या केली.’ एकवीस हजार वर्ष तुम्ही बघा, म्हणजे किती असतात ते. आणि मानव बनूनसुद्धा म्हणे, ‘मी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली आणि बारा हजार वर्षानंतर, आत्ता दोन जन्मापूर्वी मला व्हायब्रेशन्स हाताला लागले. तेव्हा आता तिसरा जन्म माझा व्हायब्रेशन्सचा असल्यामुळे त्याची मला महानता आणि मोठेपणा माहीत आहे आणि तुम्हाला माताजींनी हे असं फुकटात दिलेलं आहे हे सगळं. तेव्हा मी त्यांना पुष्कळदा विचारतो, की तुम्ही सगळ्यांना असे फुकटात कशाला वाटत चालले? त्यांना काही अक्कल तरी आहे का? त्यांना काय माहिती? तर माताजी म्हणतात, की आमची मर्जी असं समजा तुम्ही. त्या आपलं हसून असं सांगतात.’ पण तशी गोष्ट नाही. वेळ आलेली आहे. देण्याची वेळ आलेली आहे. देण्याची वेळ आली म्हणजे सर्वांना द्यावेच लागणार. वेळही आलेली आहे. परत परमेश्वरालाही विवंचनाही पडलेली आहे, की जर आता ह्या लोकांना पार नाही केलं तर मात्र सर्वनाश होणार आहे. सबंध जी काही विश्वातली सृष्टी आहे, ती माणसावर आधारित आहे. जर माणसाचा सर्वनाश झाला, तर परमेश्वराच्या ह्या पूर्ण सृष्टीचा सर्वनाश होऊन व्यर्थ होईल.

म्हणून ही वेळ आलेली आहे. आणि ह्या बहारीच्या वेळेत तुम्ही अनेक लोक पार होता. पण तरीसुद्धा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती समजून घेतली पाहिजे, की आम्हाला जर ही विशेष देणगी मिळालेली आहे, तिचा उपयोगसुद्धा एक विशेषच असायला पाहिजे आणि आम्हीसुद्धा एक विशेष झालं पाहिजे. नाहीतर उगीचच एवढी मोठी गोष्ट आम्हाला देऊनसुद्धा अगदी व्यर्थ आहे. तर समजा एखाद्या भिकाऱ्याला आपण जर राज्यपद दिलं आणि तरीसुद्धा तो भिकाऱ्यासारखा भीकच मागत बसला, तर त्या राज्यपदाचा काय उपयोग होणार! म्हणून भिकाऱ्याला असं कळलं पाहिजे, की जरी त्यावेळी भिकारी होतो तरी आत्ता मी राजा आहे आणि राजा होऊनच बसलेलो आहे. आणि माझं राज्यपद मला मिळालेलं आहे तर त्या मान्यतेने, त्या आढ्यतेने आणि त्या गौरवाने त्या माणसाने बसायला पाहिजे. नाहीतर तो राज्य कसं करणार? नाहीतर आपल्याकडचे आजकालचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांची अशी स्थिती आली की, ‘होते आधी भिकारी, राज्यपद आले तिशी, तिथे हिंडणे राहीना.’ तशी स्थिती आहे ह्या लोकांची. तेव्हा तसं झालं नाही पाहिजे. कारण सहजयोगात मूळ पद रहात नाही. ‘मूळ स्वभाव जाईना’ तशी गोष्ट आहे. ह्याच्यात तुमचा मूलाग्र अगदी बदलून जातो. तुम्ही दुसरे होऊन जाता. आधी सांगितलं होतं मी की, अंडरूपाने मनुष्य रहात असतो. म्हणून त्याला मानव असं म्हणतात. म्हणजे पशूपेक्षा बरा आहे. पशू तर पाशात असतो. त्याला पाश असतो परमेश्वराचा. त्या पाशात तो फिरत असतो. त्या पाशातून निघू शकत नाही म्हणून त्याला पशू असे म्हणतात. तो पाश मात्र सुटलेला असतो. अंडरूपाने असतो. आणि स्वत:ची कशी प्रगती करून घ्यायची ह्याची त्याला पूर्ण मुभा असते, पण त्या मुभेनंतर मग तो कसा वागतो? कुठे जातो? कसं आपलं बिघडून घेतो? काय आपली स्थिती करून घेतो, हे मात्र त्याच्या अकलेवर आणि त्याच्या सुजाणतेपणावर अवलंबून असतं. पण शेवटी असं म्हणणं आहे, की अत्यंत हे केल्यानंतर त्याला हळूहळू एकतऱ्हेचं शहाणपण येतं, सुजाणता येते, सुबुद्धी येते. आणि ही सुबुद्धी, व्हिज्डम आल्यावर मात्र तो अशा मार्गाला धरतो, जो परमेश्वराचा आहे. पण पुष्कळ लोक तसेच न धरतानासुद्धा सहजयोगात आले आहेत. तरीसुद्धा ते पार झाले आहेत. म्हणजे त्यांचा पक्षी रूपामध्ये पुनर्जन्म झाला. आता एका अंड्याचा आणि पक्ष्याचा आपापसामध्ये काही संबंध दिसत नाही बाह्यत:, पण तेच आज पक्षी रूपाने बाहेर येऊन दूसरे स्वरूप घेतले आहे. तेव्हा तुम्ही दुसर्या स्वरूपात आल्यावर तुम्हाला जर राज्यपद दिलं तर त्याला काय हरकत आहे ? असेच मी महाराजांना म्हटलं, तुम्हाला काय एवढं वाईट वाटत आहे लोकांचं? म्हणे, ‘तुमच्यासाठी किती लोक जीव द्यायला तयार होतील?’ म्हटलं, ‘मला कोणाचा जीव घ्यायचा नाही आहे. जीव द्यायला कशाला पाहिजे?’ पण तुम्हाला ज्या स्वरूपात आम्ही आणलेले आहे, आता तुम्ही संत झाले, मोठे संत झाले. तुम्ही म्हणजे आता हातावरती, बोटावरती कुंडलिनी उचलता ते फक्त गणेशाला साध्य होतं पूर्वी. ते फक्त गणेशाला साध्य होतं. पूर्वी एकेका चक्रावरती लोक कुंडलिनी उचलून थांबत असत. आज सबंध हाताने, बोटं अशी नुसती फिरवली म्हणजे एखाद्या काय पण किती लोकांच्या तुम्ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे केवढं मोठं गणेशाचं स्थान तुम्हाला दिलेले आहे! तेव्हा तुम्ही गणेश स्वरुपात आला का? आणि गणेशाचं वैशिष्ट्य फक्त एकच आहे, की नितांत आपल्या आईवरती भक्ती आणि प्रेम आहे आणि म्हणूनच सर्व शक्ती त्याला आईने दिलेली आहे. सर्व

शक्ती. ‘सर्व शक्ती समन्विते.’ ही गणेश शक्ती जी आहे त्याच्यात सर्व शक्त्या आहेत. जर तुम्ही गणेशाचं अथर्वशीर्ष म्हटलं, तर त्याच्यात सर्व शक्त्या आहेत. ब्रह्मदेवात काही आहेत. विष्णुमध्ये काही आहेत आणि महेशामध्ये काही आहेत, पण ह्या सर्व शक्त्यांच जे काही सार आहे, तत्त्व आहे ते गणेशामध्ये आहे. त्याला कारण असे आहे, की आई ही जर परमेश्वराची सर्व शक्ती असली तर त्या शक्तीचं सर्व सार तिने आपल्या मुलांना दिलेले आहे. त्या सर्व शक्त्या ह्या गणेशामध्ये आहेत. तेव्हा आपल्याला आईने गणेशस्वरुप केलेले आहे. गणेशासारखे जन्माला घातलेले आहे आणि आता आमची कुंडलिनी, जी त्रिकोणाकार अस्थीमधून निघत होती, ती आता पोटातून निघायला पाहिजे. जशी गणेशाची कुंडलिनी त्याच्या पोटात आहे. तशी आता त्या त्रिकोणाकार अस्थितून निघून ती पोटातून निघायला पाहिजे. तेव्हा मात्र खरे आम्ही संत होऊ. पोटातून निघाली पाहिजे, म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा कुंडलिनी पोटातून निघाली, म्हणजे आपण जे काही आजपर्यंत परमेश्वराला शोधत होतो, आधी आपण ते पैशात शोधत होतो किंवा आपण आधी खाण्या-पिण्यात शोधत होतो, मग पैशात शोधू लागलो. ही जी नाभी चक्राची जेवढी कार्य होती, ती आता म्हणजे साक्षात् कुंडलिनी स्वयं तिथे बसलेली आहे. म्हणजे आपल्याला आणखीन कसलाच शोध नाही, नुसते आपण कुंडलिनीवरच बसलेले आहोत. ही जेव्हा स्थिती होईल तेव्हा आपण मान्य केलं पाहिजे, की आपण खरच परीक्षेला उतरलो, आपण खरच संत झालो तेव्हा ह्याच्यावर आता आपल्याला कुठे जायचे नाही.