Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

[The Marathi part starts at 16:50 on the audio clip]

Puja date 3rd December 1990 – Place Pune

Marathi speech starts at 16:49.

काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ  आहे . तशातली गोष्ट  नाही. आपला उपयोग फार होणार आहे. फक्त आपण काही काही गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण पूर्ण जागृत असलं पाहिजे. प्रत्येक धर्म जे आपल्या देशात आहेत किंवा दुसऱ्या देशात आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्याचं नुसतं आपण असं म्हणू की यांत्रिकरण करून टाकलं आहे. किंवा सगळ्यांमध्ये पैसे कमावण्याची एक किमया बनवलेली आहे. हा काही धर्म असू शकत नाही. देवाला पैसे काही समजत नाहीत, त्याला बँक समजत नाही, काही नाही. मला जर कोणी म्हटलं की चेक लिहा तर मला समजत नाही. मी दुसऱ्याला म्हणते तुम्ही लिहा मी सही करते. तेंव्हा पैशाने जे लोक तुम्हाला लुटतात इथे देवाच्या नावावर, त्यांना एक एक कवडी देणं हे अगदी चुकीचं आहे. पहिली गोष्ट. आणि आपण कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला की लागले त्याच्यापुढे लोटांगण घालायला. तो मनुष्य तिथून जेल मधून सुटून आलेला आहे आणि तिथे भगवे वस्त्र घातलेला आहे, असं कुणाच्याही डोक्यात येत नाही. सरळ लागले आपण. खेड्यातले लोक साधे सरळ. मग त्याने सांगितलं की बघा, तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं एवढं भलं होईल, लागले त्याला पैसे द्यायला. म्हणजे एकदा आम्ही एका खेडेगावात गेलो तर सगळे यायला लागले, माताजींचं दर्शन घ्यायचं. तर एक बाई घेऊन आली, तिने मला पंचवीस पैसे दिले. म्हटलं आम्ही पैसे नाही घेत. बरं म्हणे आम्ही एक रुपया देतो माताजी. म्हणजे ते डोक्यातूनच जात नाही लोकांच्या. डोक्यातच बसलेलं आहे की देवाला हे पैसे दिलेच पाहिजेत. अरे पण त्या देवाला काय तुमचे पैसे कळतात का? हे सगळं भरलेलं आपल्या डोक्यातलं काढलं पाहिजे पहिल्यांदा की जो मनुष्य आपल्याकडून पैसे मागतो तो मनुष्य खचित परमेश्वराच्या जवळही नाही. हे खेडेगावच्या लोकांना सगळ्यांनी समजावून सांगितलं पाहिजे. आपल्याकडे साधे भोळे लोक फार आहेत. त्यामुळे कुठेही एक तुम्ही दगड मांडला, त्याच्यावर शेंदूर घातला, बसले एक जाऊन तिथे गृहस्थ, पैसे कमवायला. येता जाता सगळे त्याला लोटांगण घालतात. दोन पैसे त्याला देतात. 

त्यावरती नृसिंह सरस्वती म्हणजे, संतांनी फार हे कार्य केलं आहे. सगळ्यांना शिव्या घातल्या, सगळं काही केलं, पण कुणाच्या लक्षात येत नाही. संतांनी, त्यात   नृसिंह सरस्वती म्हणून एक ब्राम्हण होते, ते जाऊन झोडपून काढायचे त्या माणसाला. त्याचा दगड उचलून फेकून द्यायचे. एकनाथांना किती लोकांनी त्रास दिला कारण ते जाऊन महारवाड्यात जेवले. अहो साधू संतांना काही जात असते की काय ? कोणचा महार आणि कोणचा ब्राम्हण? आणि आपल्या शास्त्रात जर पाहिलं, थोडं जरी ढुंकून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की श्री रामाचं चरित्र लिहिलं कोणी त्या कोळ्याने, त्याचं नाव वाल्मिकी. त्या कोळ्यानी श्री रामाचं चरित्र लिहिलं. कुणी  ब्राह्मणानी लिहिलं नाही. तेंव्हा हे जे आपल्यामध्ये जातीपातीचे वेड आलेलं आहे ते काढलंच पाहिजे. त्याला काही अर्थ नाही. मूर्खपणाचं लक्षण आहे. 

       देवी बद्दल म्हणतात, ” या देवी सर्व भूतेषु जातिरूपेण संस्थिता” की जात म्हणजे काय? जाती काय? जात म्हणजे तुमच्यामध्ये जी एक आवड आहे किंवा उपजतच तुमची जी बुद्धी आहे ती जात. जर कोणी मनुष्य परमेश्वराला शोधतो तर तो ब्राह्मणच आहे. दासगणू म्हणतात ” आम्हांसी म्हणती ब्राम्हण आम्ही जाणिले नाही ब्रम्ह आम्ही कसले ब्राम्हण?” ते स्वतः ब्राम्हण  असतांना असे म्हणतात. तेंव्हा हा जो जातीपातीचा प्रकार आहे तो विसरून गेला पाहिजे. सहजयोगात आम्ही जातपात काहीही मानत नाही. आम्ही वैधव्य मानत नाही. पहिली गोष्ट. बायका तेवढ्या विधवा आणि पुरुष, ते नेहमी सधवाच असतात. असं करून आपण बायकांवर अनेक अत्याचार केले आहेत. अत्याचार करणे हा कधीही धर्म असू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा अत्याचार अधर्मच आहे. आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय हा अधर्म आहे. तेंव्हा, जेंव्हा तुम्ही सहज योगात  येता, तेंव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की या ज्या नुसत्या उलाढालीच्या गोष्टी आहेत, ज्यांनी नरकच आपल्या देशात उभा झालेला आहे, त्या आम्ही मानत नाही.  आणि आम्ही मानणार नाही. जातीच्या बाबतींत इतका भयंकर प्रकार आहे आपल्याकडे. आणि लग्न म्हणजे आपल्याकडे – आता दुसरी तर कर्तबगारी राहिली नाही, आपल्याला काही सिंहगडावर जायचंच नाही. कोणताच  किल्ला जिंकायचा नाही, काही नाही. आता बसल्या बसल्या आणखी करता काय तर मुला  मुलींची लग्न.  बस, त्याच्या पलीकडे काही काम नाही. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. 

    आमचा जन्म झाला तेंव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला यांनी शहाण्णव कुळामध्ये घातलं. म्हटलं कशाला घातलं त्या शहाण्णव कुळामध्ये. त्यात सगळे म्हणजे दारुडे लोक. आणि बायकांना इतकं छळतात आणि लग्न म्हणजे ते शहाण्णव कुळाचे शहाण्णव कुळातच झालं पाहिजे. सगळे बेक्कार लोक. कोणी सुशिक्षित चांगला मुलगा असला, त्याला जर मुलगी दिली तर झालं. इतका आटापिटा, त्या मुलीला झोडपून काढतात. हा कुठला प्रकार आहे? हे शहाण्णव  कुळी काय देवांनी काढलेले  आहेत का ?  सगळ्यांचे नाक तोंड एकसारखे दिसतात. सगळ्यांचे प्रश्न सुद्धा एकसारखे असतात. हसणं बोलणं सगळं एकसारखं असतांना एका आईचेच मुलं असतांना असं कसं म्हणायचं की ह्याचं त्याच्याशी लग्न होऊ शकत नाही, त्याचं त्याच्याशी लग्न होऊ शकत नाही. मग हुंडा घे रे, हे घे रे, हे आपल्या जातीतल्या सर्व ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत, सहज योग हे निर्मल करायला आलेला आहे. सगळं स्वच्छ करून. ह्याने किती ताप होतो ते  बघा. आज मुलगी आहे तर तुम्हाला ताप होतो आहे. उद्या तुमचा मुलगा झाल्यावर तुम्ही तोच ताप दुसऱ्याला देणार.  

    तर सहजयोग काही, साधू संतांचा असला तरी संन्यस्तांचा नाही. समाजात राहून, समाजाची प्रगती करून, समाजाच्या लोकांच्या विचारांची प्रगती करून समाजाला मदत करणारा असा सहजयोग पोषक आहे. तर तुमच्या जीवनात जे  स्वतःला सहजयोगी म्हणतात, ते सुद्धा जर संकुचित दृष्टीचे असले तर त्यांनी समजलं पाहिजे, अजून सहजयोग तुम्हाला समजलेला नाही. हे विश्वाचं कार्य आहे. सर्व विश्वाला एक करायला आम्ही निघालो. त्या ठिकाणी आम्ही या गावचे, तुम्ही त्या गावचे, आमचं हे, ते, यांनी काही फायदा झालेला आहे का? कुणाला फायदा झालाय का? याचा फायदा काय, पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे. त्याच कुळात लग्न करून कुणाला फायदा झाला आहे का? परवा एक बाई माझ्याशी भांडायला आल्या, या गोष्टीला घेऊन. मी त्यांचे दहा नातलग दाखवले, म्हटलं हे बघा – हे सगळे तुमचे सोयरीक. पण ज्ञानेश्वरांनी पसायदान मध्ये सांगितलं ” तेचि सोयरीक होती ते” हे तुमचे सोयरीक आहेत. पसायदान मधे जे सांगितलं ते सहजयोग आहे. साधू संतांनी हे सगळं मानलेलं नाही. त्यांना किती छळले संन्याश्याची मुलं म्हणून . संन्याश्याला मुलं झाली. ह्यांना कुणाच्या बापाला सांगितलं होत कुणी. किती छळले आपल्या इथे. तुकारामाला किती छळले. एकनाथांना किती छळून काढलं कारण ते महाराकडे जाऊन जेवले. ह्या सर्व गोष्टी. आता साधू संतांच्या भूमीत राहता ना, मग त्यांच्या सारखं वागायला पाहिजे. त्यांचे अभंग बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, तुकारामांनी काय म्हटलं आहे विठ्ठलाला? तू महार झालास हे बरं झालं. विठ्ठल काही त्याला मारायला आले  नाही त्यासाठी. ” झाला महार पंढरीनाथ” केवढी मोठी गोष्ट म्हटली. पण आता डोक्यात येतं का कोणाच्या? अहो पंढरीनाथ जर महार होतो, तर तुम्ही कोण? साधू संतांची नुसती भजनं म्हणायची आणि टाळ कुटायची. पण त्यातलं काही स्वारस्य आतमध्ये यायला पाहिजे. आणि अंधश्रद्धेवर, अंधतेवर सगळ्यांनी मेहनत केली. ज्ञानेश्वरांनी वरच्या पायऱ्या सांगितल्या आणि सांगितलं  ” नको रे बाबा ” आणि समाधी घेतली. हे महामूर्ख कसले ऐकणार. कधीतरी असं होईल तर, ते मग वाचत बसतील. 

    आता हे सगळे वाचतात त्यांची पुस्तकं. तेंव्हा महाराष्टात ह्यांचा टूर झालेला आहे. हे लोक तुम्हाला अगदी भगवंताच्या शेजारीच बसलेले पाहतात. कारण यांच्या मते म्हणे महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे. हे खरोखरच महाराष्ट्राला महा राष्ट्र समजतात आणि महाराष्ट्रीयन माणसाला देवच समजतात हे लोक. कारण एवढी परंपरा तुमची. संतांच्या भूमीवर बसलेले, तुमचा इथे जन्म झाला. म्हणजे केवढे मोठे असणार तुम्ही असा यांचा विचार आहे. पण ये रे माझ्या मागल्या. परत तोच प्रकार. आता काल सगळ्यांच्या विशुद्धया धरल्या. हे चक्र. कशानी? मला माहित आहे , तंबाखू. तंबाखू शिवाय आपल्या महाराष्ट्रात चालायचेच नाही. मग कॅन्सर होई ना का , मरेनात का. कुठून ही अवदसा आपल्या महाराष्ट्रात आली, मला समजत नाही. त्या बिचाऱ्या साधू संतांनी, सगळ्यांनी सांगितलं की मादक पदार्थ घ्यायचे नाहीत. साईनाथांनी तर सगळे तंबाखू जाळून पिऊन टाकले, शंकरा सारखे. तरी सगळे तंबाखू वर बसलेले. कुठेही गेले तरी तंबाखू. त्या विठ्ठलाकडे  चालले तरी तंबाखू खाऊन निघतात. अहो त्या विठ्ठलाला चालत नाही तंबाखू अगदी. विशुद्धी चक्रावर विठ्ठल बसलेले आहेत. आणि तुम्ही तंबाखू खाऊन त्यांच्याकडे कशाला जाता? त्यातलं गम्य असायला पाहिजे, सार धरलं पाहिजे. मग म्हणायचं माताजी आम्ही एवढे देवाला मानतो, आत्ताच बायका सांगत होत्या.

बाई – आम्ही देवीची एवढी पूजा करतो .

माताजी – आणखीन, बाकी?

बाई – काही नाही , आमच्या घरी मालक थोडं पितात दारू बिरू.

माताजी – असं का? आणि तिथे जाऊन मग चौघडे मारवतात. आणि तुमचे?

बाई – ते थोडंसं त्यांना पत्त्यांचा शौक आहे म्हणा.

माताजी – असं का? पत्ते खेळतात आणि तिकडे देवीकडे जाऊन करतात आरती? देवीची आरती. 

ही अशुद्धता आपल्या समाजात फार वाढलेली आहे. ते देवीला चालतच नाही. या सर्व गोष्टी चालतच नाही देवीला. मग फटके बसतात. फटके बसले की म्हणायचं आमचं असं कसं झालं? आम्ही एवढे देवभक्त, आम्ही एवढे शिवभक्त, आम्ही एवढे दत्तात्रयाचे भक्त, आम्हाला कसं झालं? म्हणून आधी संबंध करून घ्या त्याच्याशी.  दत्तात्रयाच्या भक्तांना हमखास पोटाला त्रास असलाच पाहिजे, लिहून घ्या तुम्ही. मी खोटे बोलत नाही. कोणालाही पोटाचा त्रास असला तर 

‘तुम्ही दत्ताचे भक्त आहात का ?

‘हो’ 

पोटाला हा त्रास असलाच पाहिजे. कारण दत्तात्रय, हे आपल्या पोटाच्या ह्या , धर्माची जी जागा, ज्याला व्हॉइड म्हणतो, इथे फोटो नाही तुम्हाला दिसत नाही, त्यांच्यात बसलेले आहेत. त्यांच्याशी  संबंध न होतांना दत्त दत्त करीत बसायचं. तसंच साक्षात दत्त म्हणजे मोहम्मद साहेबच आहेत. तर मुसलमानां नासुद्धा पोटात त्रास राहणार. मोहम्मद मोहम्मद करून काय मुसलमानांना मिळणार नाही. संबंध व्हायला पाहिजे. त्यांनाही समजत नाही कधी कधी, आम्ही देवाला मानतो मग हे असं कसं आमच्यावर, अशी संकटं कशी? त्याला कारण तुम्ही अजून समजलेले नाही. मोहम्मद साहेबांनी तर सांगितलं आहे विशेष, की अशी वेळ येईल ज्याला त्यांनी कियामा म्हटलं आहे. म्हणजे पुनरुत्थान – रिसरेक्शन होईल. त्यावेळला तुमचे हात बोलतील. सहजयोग सांगितला आहे सबंध. अशी व्यक्ती येईल जी सगळं काही सांगेल. सगळं सांगिलंय.  तेंव्हा मुसलमान काही कोणी दुसरे नाहीत, हिंदू कोणी दुसरे नाहीत. सगळे आपल्यातलेच लोक आहेत. पण जेंव्हा मार्ग मिळाला नाही तेंव्हा असंच दिसतं. आंधळ्यांचं असंच आहे. आंधळ्यांना जसं हिरवा आणि लाल काहीच दिसत नाही तसं त्यांना आपण सगळे एक आहोत असं दिसत नाही. त्यामुळे ही भांडणं आणि तंटे आणि काय काय चालू. त्याला काही अर्थ आहे?

     भांडकुदळपणा तर महाराष्ट्रात अगदी पाचवीला पुजलेला आहे. दुसरं म्हणजे भाऊबंदकी. जरासा कुणी पुढे आला मनुष्य, की माझे कान लागले भरायला. म्हटलं आता मी कानच बंद करून टाकते म्हटलं. मला सगळं समजतंय, हे कोणाला  माहीतच नाही. येऊन मला सांगतील, हा मनुष्य असा आहे, भयंकर राजकारणी आहे माताजी, त्याच्या पासून बचावून रहा. म्हटलं मला तुमच्यापेक्षा जास्त माहित आहे त्याचं. मग सांगते सगळं काही तुम्हाला. मग अगदी डोळे वटारून बघतील. कसं कळलं तुम्हाला? कळतं ना मला, मला सांगू नका तुम्ही फालतूचे धंदे. ह्याचं त्याच्यावर, त्याचे त्याच्यावर, काही विचारू नका.  म्हणजे सहजयोग वाढणार कसा? बरं या लोकांमध्ये ही गोष्ट नाही हं. अगदी नाही. एकदा सहजयोगात आले म्हणजे इतके नम्र आहेत, इतके नम्र आहेत की आम्हाला फार मोठं मिळालं. त्याची कल्पना नाही ना आपल्याला. कधी भांडणं नाही, तंटा नाही एक दुसऱ्याविरुद्ध बोलणं नाही, कारण मला आवडत नाही ते. आणि काय असेल ते तोंडावर स्पष्ट बोला, पाठीमागे नाही. हे लोक ज्यांच्या मागे हा पाया नाही, ज्यांच्या मागे संतांची भूमिका नाही, ज्यांच्या इथे श्री रामा सारखे राजे झाले नाहीत, शिवाजी सारखे तिथे वीर झाले नाहीत ते लोक इतके वर आलेत, आणि आपण कुठे राहिलो? ह्यांनी एवढं मिळवलं मग आपण का मिळवू नये? आपली पूर्वपिठीका किती मोठी, अहो आपण सिंहासनावर बसलेले लोक आहोत आणि वागतोय कसे? 

    बेकारच्या लोकांना मिंधे होतात आणि मिंधे होऊन आपलं सगळं सत्वच घालवलेलं आहे. या महाराष्ट्रात पुष्कळ जागृती करायला पाहिजे. आणि होईल . कारण महाराष्ट्राला जी संपदा आहे ती कुठे साऱ्या जगात नाही. म्हणून मी एवढी मेहनत इथे करते. म्हणून मी महाराष्ट्रात जन्म घेतला. आणि महाराष्ट्रात इतक्या वर्षांपासून मेहनत करत आहे. तेंव्हा सगळ्यांनी समजून घ्यावं की आपली जबाबदारी काय आहे. महाराष्ट्राची जबाबदारी काय? तुम्ही जरी खेड्यात रहात असला, अशिक्षित असला तरी तुमच्या आतली जी स्थिती आहे ती फार उच्च आहे. तेंव्हा त्या स्थितीला प्राप्त व्हा आणि साऱ्या जगाला दाखवायला पाहिजे की या महाराष्ट्रातला एक साधारण शेतकरी सुद्धा किती उच्च प्रतीचा मनुष्य आहे. तोंडाने बोलायला सगळे आहे, पढत मुर्खासारखे महात्म्य वाचत बसतील. वाचून का काही होणार आहे? पारायणावर पारायणं, सप्ताहावर सप्ताह. त्याने कोणाला काही मिळाले आहे का? कोणच्याही गावात जा, माताजी इथे सप्ताह चाललाय. अरे काय त्या सप्ताहानी होतंय तुमच्या? काही भलं होतंय का त्यानी?  तेंव्हा जागृत व्हायला पाहिजे आणि जागृत होऊन समजलं पाहिजे की आपली ही दुर्दशा का?  आपण या सर्व त्रासात का आलो? आणि ते जागृत होणं काही कठीण नाही. तुमच्यातच ती संपदा आहे. तुमच्यातच ती सर्व शक्ती आहे.  ते तुमचंच तुम्हाला द्यायचं आहे. “तुझं आहे तुझं पाशी” ते तुम्हाला द्यायचं आहे. माझं त्याच्यात  देणंघेणं लागत नाही काही. माझे काही उपकार नाहीत. आईचे काही उपकार असतात का? तुम्ही मानला म्हणून माना. पण आई आपल्या आनंदासाठी सगळं काही करते.

    आता या शहराची विशेषता अशी आहे, या जागेची, शेऱ्याला आम्ही जमीन घेतली, ते नुसतं चैतन्य बघून. आणि मग ही जमीन मिळाली. आता इथे येऊन राहणार आहेत, तेंव्हा तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना सांगितलं आहे की आम्ही जागा घेतलेली आहे. तर हे सर्व भक्त आहेत देवीचे, तेंव्हा यांना सांभाळलं पाहिजे. देवीचं इथे स्थान सुद्धा आहे. आणि त्यांच्या समोर, हे दाखवलं पाहिजे, की तुम्ही किती गहन आहात. सर्व तऱ्हेने तुमची उन्नती होऊ शकते. फक्त तुम्ही आपल्या गहनात उतरून घ्या आधी. नाहीतर उन्नती झाली तर उद्या दारू प्यायला जाल. नाहीतर काही घाणेरडं काम करायला जाल. सर्वात आधी पाहिजे, की आपली आतली शक्ती जागृत झाली पाहिजे. ही एक मनात इच्छा असायला पाहिजे की आमची जागृती झाली पाहिजे. 

    आज तुम्ही पूजेला आलात. पूजे मध्ये चैतन्य वाहतं. सहसा आम्ही जो सहजयोगी नाही, त्याला येऊ देत नाही. ज्याला चैतन्य मिळालेलं नाही अशा माणसाला पूजेला येऊ देत नाही कारण त्याला जमत नाही ते, झेपत नाही. पण जर तुम्ही नम्रपणे बसले असाल तर सगळ्यांना या पूजेचा लाभ होईल आणि सगळ्यांना बरं वाटेल. तर नम्रपणे बसायचं. आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे असं लक्षात आणायचं. जी तुमची संपदा आहे, आतमध्ये, त्यानेच हे कार्य होणार आहे. मग त्यानंतर येऊन सांगा मला तुम्ही, मग हेच पत्र येतं की माताजी आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत. हे देण्यासाठी सर्व खेड्यापाड्यातून मी फिरत असते. आज वीस वर्षांपासून ही मेहनत चालू आहे. आता बघायचं महाराष्ट्रात किती कार्य होतं ते.  तसं दिल्लीला वगैरे, दिल्लीच्या पलीकडे गावाखेड्यात पुष्कळ काम चाललं आहे. तसं इकडे व्हायला पाहिजे, कारण ही संतांची भूमी आहे, आणि तुमचा हा वारसा आहे. संतांना तृप्त करायला पाहिजे. संतांना वाटलं पाहिजे की आम्ही यांना दिलं ते मिळालं आहे. नुसती तोंडाची चर्पटपंजरी नको. आणि बसून टाळ कुटणं नको. त्या टाळेच्या मागे जे निनाद आहेत ते तुमच्यामधून उमटले पाहिजेत आणि त्याची व्यवस्था फार सोपी आहे.        

Ends at 37.03