Makar Sankranti Puja

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja

आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.

 पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून भांडण, तर कुणाचं कशावरून भांडण. अर्धे पळाले, अर्धे राहिले. म्हटलं सहजयोग काही व्हायचा नाही. कारण एक आला कामाला, दोन दिवसाने पळाला. दूसरा आला तो तीन दिवसाने पळाला. तर अशी स्थिती होती. त्या पळापळीतच आपण सहजयोग बसवलेला आहे.

 पण त्याला मुख्य कारण एकच, की तुम्हाला इच्छा असायला पाहिजे की, ‘काहीही असलं तरी आम्ही परमेश्वराला भेटायला आलोत. आम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद हवे. आम्हाला परमेश्वरी तत्त्व जाणायचंय. आम्हाला जगातल्या ह्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत, ज्याने सगळ्यांना ताप आणि त्रास होतोय त्यांना नष्ट करायचंय.’ तेव्हा इथे भांडाभांडी करून चालणार नाही. ह्या अहंकारामुळे इतके त्रास सबंध जगामध्ये झालेले आहेत ! आता सहजयोगामध्ये मात्र ह्याला पूर्णपणे तिलांजली दिली पाहिजे. आणि तिलांजली म्हणजे तिळांची अंजली. म्हणजे हातात हे तीळ घेऊन त्याची अंजली तुम्ही देऊन टाकावी. म्हणजे आता ह्याच्यापुढे आपण काही खोट करणार नाही. रागवणार नाही.

 एकवेळा करून बघा. एक वेळेला करून बघायचं! न रागवता किती तरी गोष्टींना मनुष्य समेटू शकतो. किती तरी गोष्टींचा सामना करू शकतो आणि किती तरी गोष्टींकडे नुसते लक्ष न दिल्यामुळे सबंध जसं काही उत्तरच त्याचं मिळालेले आहे, सबंध त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत, असं तुमच्यासमोर सगळं दृश्य येईल. तेव्हा कोणत्याही गोष्टीला आपण अत्यंत जर महत्त्व दिलं, तर आपण त्याच्यामध्ये तामसिक स्वभावाचे झालो. असं म्हणता येईल. तामसिक म्हणजे काय? जो मनुष्य एक लहानशी गोष्ट असेल त्याचं खूप मोठं वैराण करतो. म्हणजे एखादी बाई, आता तिचा नवरा आजारी. ‘माझा नवरा आजारी, माझा नवरा आजारी.’ कबूल. पण तू आहेस ना ! तुझी तब्येत ठीक आहे नां! तुझ्याबद्दल काय? ते काही नाही. पण तो तरी म्हणा नवरा आहे, ते तरी महत्त्वाचं आहे. पण एक लहानशी गोष्ट घेऊन बसायचं. त्याच्यासाठी वैराण करायचं. दूसर्यांना हैराण करायचं. त्रास द्यायचा. ही जी आपल्याकडे एक पद्धत आहे, त्याला कारण असं आहे, की आपल्यामध्ये क्षुल्लक गोष्टींचं महत्त्व जास्त आहे आणि मोठ्या गोष्टींकडे लक्षच नाही.

ह्या लोकांना काय, मोठे आणि लहान सगळे बरोबरच आहे. काही समजत नाही त्याच्यातलं. पण तुम्हाला समजलं पाहिजे. कारण आपलं जे काही आहे एवढं मोठं, हा जो काही वारसा मिळालेला आहे, फार मोठा आहे. तेव्हा वारसा मिळाला. आम्ही ह्या योगभूमीत जन्माला आलो. ह्या योगभूमीत आम्ही आल्यावर आम्ही काय मिळवलं? हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर म्हणतात हिंदुस्थानात जन्म होतो आणि त्याच्या हजार वर्षानंतर महाराष्ट्रात होतो. आता रस्त्यात झिंगत लोक पाहिले, की मला समजत नाही, महाराष्ट्रातले आहेत की कुठले आहेत? म्हणजे किडे कसे जन्माला आले ते समजत नाही.

 आता तुम्ही सहजयोगी झालात. कारण तुमची पूर्वजन्माची तपश्चर्या आहे. आज ती फळाला आली. पण त्याचा अर्थ असा नाही, की बाकीची आता ह्या जन्मातली तपश्चर्या  आता माताजींनी करायची. ह्या जन्मातली पहिली तपश्चर्या म्हणजे आपापसात गोड बोललं पाहिजे. प्रेमाने वागलं पाहिजे. तोडून नाही बोलायचं. पहिली गोष्ट. म्हणून आज पहिला दिवस आपला पूजेचा आपण सुरू केलेला आहे. त्यादिवशी आपण सर्वांनी गोड बोललं पाहिजे आणि गोडीत राहिलं पाहिजे. कारण गोड बोलणं हे फार सोपं काम आहे. रागावणं तर त्याहून कठीण आणि मारणं तर जमतच नाही माणसाला. तेव्हा कशाला कठीण कामं करायची. सरळ गोड बोललं की झालं. आता आपल्याकडे पुष्कळांची नावं ‘गोडबोले’ वगैरे असतात. मी असा विचार केला की ह्यांच्या फॅमिलीतच लोक गोड बोलत असतील वगैरे. तर खरोखर ते लोक गोड बोलत असत. पण ते गोड बोलून दुसऱ्यांचे गळे कापायचे. मग म्हटलं हा काय प्रकार ! ‘अहो,’ म्हणे, ‘पूर्वी आमच्याकडे लोक गोड बोलत असत. त्यांच्या गोड बोलण्यामुळे लोकांनी त्यांचा फायदा उचलला. आता आम्ही गोड बोलतो, पण आम्ही गळेही कापतो.’ म्हटलं, ‘कशाला? हे काही तुम्ही चांगल शिकले का? हे काही तुमचं भलं केलं का? त्याच्या वर गेलात का तुम्ही?’ ती मंडळी बरी होती जी गोड बोलायची. ती आरामात राहिली. संतोषात राहिली.

 दोन माणसांबरोबर तुमची भांडणं झाली उद्या आणि तुम्ही त्यांचे गळे कापले. तर तुम्ही मिळवलं काय? आपण मिळवलं काय हे बघितलं पाहिजे. तेव्हा आजचा दिवस विशेष सणाचा. सगळ्यांना अत्यंत साजरा असा आहे. ह्यावेळेला मला तरी काही कडू बोलायचं नाही आणि सगळ्यांचं मन राखून मी सांगते, की मी एवढी काळजी घेत असते, कुठून असं नाही झालं पाहिजे, की लोकांना वाईट वाटेल किंवा काय होईल. आता काही लोक येतात की माझ्या अंगाला पटकन हात लावतात. आता त्याने त्रास होतो मला. तसं करायचं नसतं. पण सांगायचं कसं ? मग सहन करते मी! जाऊ दे बाबा, काय करता आता? कसं, त्याला वाईट वाटेल. असं पुष्कळ सहन करावं लागतं. मला काही हरकत नाही, हे सहन करण्याची. कारण त्याला दुखवलं तर त्याला दु:ख वाटेल. कशाला? तेवढं दु:ख मी सहन करू शकते. आपल्यामध्ये जेवढी शक्ती असते ती दुसऱ्यामध्ये नाही ही जाणीव असल्यामुळे त्याचं काही वाटत नाही.

त्या प्रेमाच्या बाबतीतसुद्धा तसंच. आपल्यात जर प्रेमाची शक्ती जास्त आहे, आणि दुसऱ्याची कमी आहे, तर आपण मोठे की ते दूसरे. असा एक सारासार विचार जर घेतला, तर आपण सहजयोगी आहोत आणि आपल्याला आईने प्रेमाची शक्ती दिली आहे. तेव्हा आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत. तेव्हा ते काहीतरी बोलले तर आपलं काय जातं त्याच्यामध्ये. त्यांच्याशी एवढी भांडाभांडी आणि रागराग करण्याची काय गरज. हळूहळू तुमचा स्वभाव शांत झाला. तुमच्या चेहऱ्यावर तेज येणार. इतकेच नव्हे तर चार  माणसं तुमच्या आसपास आले तर तुम्हाला बघून म्हणतील की हे शांत आहेत. पण शांतपणाचा हा अर्थ नव्हे की तुम्ही कोणी जोडे मारले तरी खा. असं मुळीच नाही. फक्त सहजयोग्यांसाठी ख्रिस्ताने सांगितलेले आहे, की तुमच्या तोंडात कोणी थोबाडीत मारली तर दुसरे थोबाड पुढे करा. फक्त सहजयोग्यांसाठी. इतर लोकांसाठी नाही. इतर लोकांनी जर एक थोबाडीत मारली , तर तुम्ही चार मारा असं मी सांगेन. कारण त्यांची भूतं असतील तर निघून जातील.

 पण आपापसामध्ये, सहजयोग्यांच्यामध्ये तुमचं बोलणं शुद्ध असायला पाहिजे आणि प्रेमळ असायला पाहिजे. ही फार आवश्यक गोष्ट आहे. सगळ्यांनी प्रेमळपणे आपापसात बोलणं केलं पाहिजे आणि जो बाहेरचा मनुष्य आहे, त्याच्यावर तुम्ही असे बोलले तर मला काही हरकत नाही. पण जो आपला आहे, हा सहजयोगी सगळा माझ्या अंगात आलेला आहे. एक एक मनुष्य माझ्या शरीरात गेलेला आहे. तुम्ही जर एकदुसऱ्यांना लाथा मारल्यात किंवा शिव्या दिल्यात, त्या मलाच तुम्ही शिव्या देता असं समजलं पाहिजे.

कारण आता बघा एका झाडावर जर १०  फांद्या  आहेत, त्या जर आपापसांत भांडल्या तर त्या झाडाचं काय होणार आणि त्याच्या पानांचं काय होणार? माझाच हात जर माझ्या हाताशी भांडू लागला तर कस काय होणार? जर ही गोष्ट लक्षात अली की आपण सर्व एक आहोत, समग्र, आपल्यामध्ये इतकी एकी आहे की आपण एका शरीरांतले अंग प्रत्यंग आहोत. तेंव्हा आपण कसं बरं वागलं पाहिजे, आपल्यामध्ये किती समज असायला पाहिजे, किती प्रेमाचा ओलावा पाहिजे , किती आपापसामधे सुख देण्याची इच्छा…..काय करू म्हणजे यांना आनंद वाटेल , त्यांना काय देऊ? त्यांना काय आवडेल ? आता आम्ही दिवाळीला देतो किंवा संक्रांतीला देतो.  

 आज काय द्यावं बरं वाण त्यांना , तर जे स्वस्तात स्वस्त असेल, ते काहीतरी घाणेरडं आणून द्यायचं. हे विशेष. त्याच्यात आपण हुशार. अगदी स्वस्तात स्वस्त जे मिळेल ते, घ्यायच बाजारातनं आणि ते आणून द्यायचं – हे वाण घ्या हं – म्हणजे दुसऱ्यानं उचलायचं आणि फेकून टाकायचं. तेंव्हा हृदयाचा मोठेपणा असल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. आणि त्या हृदयाच्या मोठेपणाला तुम्ही मुकलेले नाहीत. ते हृदय तुमच्यात आहे . कारण तुमच्या हृदयामध्ये आता जो दिवा पेटलेला आहे , आत्म्याचा , त्यांनी तुम्हाला खूपच प्रकाश दिलेला आहे. असं स्वच्छ , सुंदर, निर्मळ हृदय, त्या हृदयातून जे काही अत्यंत प्रेमळ असं वाहतंय, त्याच्याकडे बघत बघतच आनंदानी बघत राहायचं. मी आले इथे आणि तुम्हा सगळ्यांना बघून मला असं झालं, की  अरे  या हृदयाच्या प्रकाशातून काय काय वाहून राहिलाय बघा तरी !  काय मजा येऊन राहिलीय. तसं तुम्हाला सगळ्यांना वाटलं पाहिजे, की आम्ही माताजींच्या अंगातील अंग प्रत्यंग आहोत. आम्ही काही चुकलो तर माताजींच्या अंगाला त्रास होतो. त्यांच्या  ह्याला त्रास होईल. तर आम्ही असं वागलच नाही पाहिजे. आमच्यामध्ये एक तऱ्हेचा सुज्ञपणा असायला पाहिजे, एक तऱ्हेची ओळख असायला पाहिजे. आणि वागतांना आमच्यामध्ये सोज्वळता असायला पाहिजे. काहीतरी बहकल्यासारखं एखाद्याच्या मागेच लागायचं किंवा असते कोणी, काहीतरी बहकल्यासारखं बडबडत रहायचं किंवा बोलत रहायचं. पुष्कळांना गाणं म्हणण्याची टूम असते. कुणी कविताच वाचत बसेल, तर कोणी गाणंच म्हणत बसेल, कोणी काय.. असं नाही. जे बरोबर, व्यवहारी आणि सौंदर्यमय असेल ते केलं पाहिजे. वागण्यामध्ये सुद्धा सुंदरता असायला पाहिजे. आणि आपण आता जेव्हा सगळे दागिने वरगैरे करतो आईसाठी, किती सुंदर असतात. पण तुम्हीच माझे दागिने आहात. तुम्हालाच अंगावर मी लेवून घेतलेले आहे. त्या दागिन्यांमध्ये जर स्वच्छता नसली, किंवा त्याच्यामध्ये जर अशुद्धता म्हणजे, त्याच्या अंगातले जे मुख्य गुण आहेत, तेच नाही त्याच्यात. सोन्याचं जर सोनं नसलं, सोन्याच्या जागी पितळ असलं, तर त्याला काय अर्थ आहे? तसंच तुमचं आहे. जर तुमच्या अंगातला मुख्य जो धातू आहे, तोच जर खोटा असला, तर त्याला घालून मी कुठे मिरवायचं?

 तेव्हा तुम्हीच माझं लेणं तुम्हीच माझं भूषण आहात. तुम्हीच मला भूषवून दिलेले आहे. मला कोणत्याच दुसऱ्या भूषणाची गरज नाही. असं मी तुमच्याजवळ आता फार विनवून सांगते, की बोलतांना वगैरे एकंदरीत मुलांच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत, अत्यंत समजूतदारपणाने, अत्यंत नम्रपणाने आणि सावकाशपणे सगळे कार्य झालं पाहिजे. कोणावरही जबरदस्ती, जुलूम किंवा घाई वगैरे करण्यात काही अर्थ नाही. अशा रीतीने एक दिवस असा येणार आहे, की सगळं जग तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित होईल. ‘अहो, ही मंडळी कुठली? हे कुठले लोक? हे कोण आले?’ मग कळेल, की हे स्वर्गातले दूत आलेत. सर्व जगाला सांभाळण्यासाठी, सर्व जगाला यश देण्यासाठी, सर्व जगाला परमेश्वराच्या दारात नेण्यासाठी, हे परमेश्वराने पाठवलेले  दूत आहेत. अशा सर्व दूतांना माझा नमस्कार!